06 December 2019

News Flash

फोनवर बोलली नाही म्हणून नववधूला नवरदेवाची मारहाण

अमोल एकनाथ राऊत याचे मावळ परिसरातील एक मुलीसोबत लग्न ठरले होते. मंगळवारी विवाह समारंभ होता.

प्रतिकात्मक छायाचित्र

लग्नाच्या एकदिवस अगोदर फोनवर का बोलली नाही, या क्षुल्लक कारणावरुन नवरदेवाने लग्न मांडवात धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. नवरदेवाने नववधूला मारहाण करत तिला ठार मारण्याची धमकीही दिली. वडगाव मावळ येथील विशाल लॉन्स येथे हा प्रकार घडला. नवरदेवाने मुलीच्या कुटुंबीयांकडे १२ तोळे सोन्याचे दागिने आणि एक चारचाकी गाडी हुंडा म्हणून मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  याप्रकरणी नवरदेव अमोल एकनाथ राऊत,वडील एकनाथ राऊत,नवरदेवाचा भाऊ योगेश राऊत आणि लग्न जुळवण्यात मध्यस्थी करणारा व्यक्ती सुभाष बाबुराव भोरे यांना वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल एकनाथ राऊत याचे मावळ परिसरातील एक मुलीसोबत लग्न ठरले होते. मंगळवारी विवाह समारंभ होता. वधू आणि वर पक्षाकडील मंडळी मांडवात जमली होती. सकाळी वडगाव मावळमधील विशाल लॉन्समध्ये साखरपुडा, हळदी हे सर्व विधी पार पडले. एवढ्या वेळेत सर्व पाहुणे मंडळींनी जेवण करून घेतले. सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास लग्न होण्यापूर्वी नवरदेव अमोलने नववधूला “तू फोनवर का बोलली नाहीस असा जाब विचारत तुला कापून टाकेल मला लग्न करायचे नाही” अस म्हणत मारहाण केली.

याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात पीडित नवधूच्या वडिलांनी फिर्याद दिली असून त्यात नवरदेवकडील मंडळीनी १२ तोळे सोन्याचे दागिने आणि एक चारचाकी हुंडा म्हणून मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित नववधूच्या कुटुंबाला लग्न समारंभासाठी तब्बल १० लाख रुपयांचा खर्च आला. तसेच लग्न न करता त्यांची फसवणूक करून विश्वासघात केला आहे अस फिर्यादीत म्हटलं आहे. घटनेप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात हुंडा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेवासह चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.

First Published on April 18, 2019 2:29 pm

Web Title: newly wed hit bride on stage demands dowry at maval
Just Now!
X