News Flash

मंत्रिमंडळ विस्तारावेळी नारायण राणेंचा विचार करू: रावसाहेब दानवे

सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करेल

मंत्रीमंडळ विस्तारप्रसंगी त्यांना मंत्रिपद देण्याबाबत विचार करु, असे दानवे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषद अथवा मंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन दिलेले नाही. मात्र, एनडीएच्या मंत्रिमंडळ विस्तारप्रसंगी त्यांना मंत्रिपद देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे भाजप प्रदेश अध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.

नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या एका रिक्त जागेसाठी सोमवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारत भाजपने प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली. यामुळे राणे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याप्रकरणी नारायण राणे यांना योग्य न्याय मिळेल, असे सांगत आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी नारायण राणे यांना मंत्रीपद देण्याबाबत सकारात्मक विचार होईल, असे दानवेंनी म्हटले आहे.

लवकरच मध्यावधी निवडणुका होतील, असे शिवसेनेकडून वारंवार सांगितले जाते. याबाबात विचारले असता रावसाहेब दानवे म्हणाले की, राज्यात आणि केंद्रातील सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीची रक्कम मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रश्नावर ते म्हणाले की, काही ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसेल. पण या महिन्याअखेर सर्व शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी होतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि नाना पटोले हे भाजपच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. त्यांच्याविषयी पक्ष काय भूमिका घेणार असे विचारले असता , यशवंत सिन्हा हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबाबत मी काही बोलणार नाही. नाना पटोले यांच्या विधानाबाबत तूर्तास तरी कारवाई करणार नाही. त्यांच्या वक्तव्याकडे पक्ष गांभीर्याने लक्ष देत आहे. वेळ पडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे दानवेंनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2017 7:27 pm

Web Title: next cabinet expansion bjp chance narayan rane as minister says raosaheb danve
Next Stories
1 …’पद्मावती’बाबत राज्य सरकार हस्तक्षेप करणार: गिरीश बापट
2 पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्ट यंत्रणेतील बिघाडामुळे वृद्ध महिलेने गमावला जीव
3 देशात-राज्यात हुकूमशाही व ठोकशाहीच्या दिशेने वाटचाल
Just Now!
X