मुंबई परिसरात दुपारनंतर वारे गतिमान

पुणे : महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये पुढील पाच दिवस तापमानवाढ कायम राहणार असून, विदर्भात या काळात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात सर्वच ठिकाणी आठवडय़ापासून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे असून, २ आणि ३ एप्रिलला या भागातील कमाल तापमान देशातील उच्चांकी तापमान ठरले. मुंबई परिसरात दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढल्याने उन्हाची दाहकता कमी झाली.

दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी आणि लगतच्या भागावर असलेल्या चक्रीय वाऱ्यांची स्थिती आता दूर झाली आहे. राज्यात पुन्हा सर्वत्र कोरडे हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील पाच दिवस कमाल तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी विदर्भातील तापमानात किंचित घट झाली असली, तरी पुढील पाच दिवस या भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. २ एप्रिलला चंद्रपूर येथे ४३.६ अंश आणि ३ एप्रिलला चंद्रपूर, ब्रह्मपुरी येथे ४३.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान देशातील उच्चांकी तापमान ठरले.

रविवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भापाठोपाठ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा झपाटय़ाने वाढतो आहे. मराठवाडय़ातील परभणी आणि नांदेड भागात ४१ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा पोहोचला आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि जळगावमध्ये तापमान ४० अंशांपुढे आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी भागांत कमाल तापमान ३९ अंशांच्या आसपास आहे. कोकण विभागात मुंबई परिसर, रत्नागिरीसह सर्व ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीच्या जवळ आहे.

मुंबईत पारा स्थिरावला..

मुंबईतील तापमान सर्वसाधारण अंशांवर स्थिरावले असून, रविवारी कु लाबा येथे ३२.७ तर सांताक्रूझ येथे ३२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दक्षिण महाराष्ट्राच्या किनारी भागात वारे चक्राकार गतीने वाहत असल्याने येथे वाऱ्यांचा वेग वाढला आहे. परिणामी, मुंबई आणि परिसरातही दुपारनंतर वाऱ्यांची गती वाढली आहे.