पूर्वार्ध

पुणे :  राज्यभरात अकरावी ते पदव्युत्तर पदवी दरम्यानच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा एप्रिल-मेपर्यंत पुढे ढकलल्या जाणार असून, परिणामी पुढील दोन शैक्षणिक वर्षेही विस्कळीतच राहणार आहेत.

देशात मार्चपासून करोनाचा संसर्ग सुरू झाल्यावर दहावी-बारावीपासून पदव्युत्तर पदवी पर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा, प्रवेश परीक्षा, निकाल आणि नव्या शैक्षणिक वर्षांचे प्रवेश या प्रक्रियेला विलंब होऊन यंदाच्या (२०२०-२१) शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक बिघडले आहे. शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक बिघडल्याने पुन्हा परीक्षा आणि निकालांना उशीर होणार आहे. त्यामुळे यंदाचेच नाही, तर पुढील दोन शैक्षणिक वर्षे विस्कळीतच राहणार असल्याचा शिक्षण तज्ज्ञांचा अंदाज आहे. पुढील वर्षी शैक्षणिक वर्षांत विस्कळीत शैक्षणिक कामकाज पूर्वपदावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कु लगुरू आणि भारतीय विद्यापीठ महासंघाचे अध्यक्ष डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, की करोनाचा पुढील दोन शैक्षणिक वर्षांवर परिणाम होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे ऑनलाइन आणि ऑफलाइन अध्यापनासारख्या पद्धतींचा वापर करावा लागेल. शैक्षणिक वर्ष पूर्वपदावर कधी येईल याबाबत सांगता येणार नाही. लसीचे वितरण किती लवकर होईल यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

‘करोनाचा पुढील वर्षीच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम नक्कीच होणार आहे. ऑनलाइन शिक्षण पुरेसे ठरत नसल्याने परीक्षेवर अवलंबून असलेली मूल्यमापन पद्धती बदलून नव्या शक्यता विचारात घ्याव्या लागतील, सत्र कालावधी कमी करावा लागेल,’ असे मत सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मांडले.

दहावी-बारावीसाठी ‘परीक्षा केंद्रित शिक्षण’

करोना संसर्गाचा काळ शैक्षणिकदृष्टय़ा आव्हानात्मक आहे. स्वाभाविकपणे पुढील दोन शैक्षणिक वर्षे विस्कळीतच असतील. मात्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होण्याला प्राधान्य द्यावे लागेल. त्या दृष्टीने परीक्षेसाठी आवश्यक तितकाच अभ्यासक्रम शिकवल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळेल. विद्यार्थ्यांना स्वअध्ययन, सहअध्ययनासाठीही प्रोत्साहित करून आवश्यकतेनुसार शिक्षकांनी मार्गदर्शन करावे, असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी सांगितले.

‘करोना’मुळे पुढील शैक्षणिक वर्षांवरही परिणाम होणारच आहे. कारण दहावी-बारावीच्या परीक्षा, विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा दरवर्षीच्या वेळापत्रकानुसार होतील का, याबाबत काहीच खात्री नाही. पुढील शैक्षणिक वर्षांत अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर परिणाम होणार आहे. अभ्यासक्रमातील काही भाग कमी करण्याबाबतचा विचार करावा लागेल. तसेच पुढील शैक्षणिक वर्ष किमान एक-दोन महिने पुढे जाण्याची शक्यता आहे.

– डॉ. भास बापट, अधिष्ठाता, शैक्षणिक विभाग, आयसर पुणे