चित्रपटगीतांची १७९० पुस्तिका ‘एनएफएआय’च्या संग्रहात
चित्रपटगीतांचे बोल हल्ली अपवादानेच लक्षात राहात असले तरी एके काळी जुनी गाणी ऐकण्याबरोबरच त्यांचे शब्दही रसिक मनात जपून ठेवायचे. बहुतेक चित्रपटांच्या गाण्यांच्या पुस्तिका निघायची आणि त्या प्रचंड लोकप्रिय देखील व्हायच्या! जुन्या गाण्यांचा ठेवा उलगडणाऱ्या आणि त्याबरोबरच चित्रपटांविषयीचे बारीकसारीक तपशीलही देणाऱ्या हिंदी चित्रपटगीतांच्या तब्बल १७९० पुस्तिका एका संग्राहकाकडून मंगळवारी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाल्या आहेत. चित्रपटांबाबत संशोधन करु इच्छिणाऱ्यांना या पुस्तिकांचा उपयोग होणार आहे.
अगदी १९३४ पासून २०१२ पर्यंतच्या चित्रपटांच्या गाण्यांच्या पुस्तिका यात आहेत. गायक अभिनेते म्हणून पडद्यावर आलेले पं. फिरोज दस्तूर यांचा ‘बाग ए मिस्र’ (१९३४), के. एल. सहगल यांनी अभिनय केलेला ‘चंडीदास’ यासह देविका राणी यांचा ‘जवानी की हवा’ (१९३५), सबिता देवी यांनी अभिनय केलेला ‘कोकिला’ (१९३७), कमलेश कुमारी यांचा ‘द प्रेसिडेंट’ (१९३७) या चित्रपटांच्या गीतांच्या पुस्तिका प्राप्त झालय़ा असून १९५० च्या आतील चित्रपटांच्या गीतपुस्तिकाही मोठय़ा संख्येने मिळाल्या आहेत. काही जुन्या पुस्तिकांची पाने सुटी झाली असली तरी सर्व पुस्तिका चांगल्या स्वरुपात आहेत. विशेष म्हणजे बहुसंख्य गीतपुस्तिकांमध्ये हिंदीसह इंग्रजी, गुजराती व उर्दूमध्येही गाणी छापली आहेत. तसेच चित्रपटाचे कथासार, चित्रपट कुठे बनला, कलाकार व तंत्रज्ञ कोण होते याची इत्थंभूत माहिती आहे. जे चित्रपट प्रत्यक्ष उपलब्ध नाहीत त्यांच्या माहितीसाठी हा तपशील महत्त्वाचा समजला जातो.
‘एनेफएआय’चे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले,‘‘गीतपुस्तिकांचे संदर्भांच्या दृष्टीने मोठे महत्त्व असते. एकाच दिवसात एवढय़ा संख्येने गीतपुस्तिका संग्रहालयास मिळणे ही मोठी बाब आहे. या पुस्तिका जशाच्या तशा राहाव्यात म्हणून त्या ‘अ‍ॅसिड फ्री बॉक्स’मध्ये ठेवून त्यांचे जतन केले जाईल.’’ हाताने चित्रे काढल्यासारखी दिसणारी मुखपृष्ठे, छापील छायाचित्रे यातून छपाई तंत्राच्या प्रगतीचा आलेखही या पुस्तिकांमधून समोर येतो आहे. बऱ्याच गीतपुस्तिकांच्या मागे त्या चित्रपटनिर्मात्या कंपनीच्या पुढच्या चित्रपटांची पूर्वप्रसिद्धीही करण्यात आली असून त्या काळी चित्रपटांच्या प्रदर्शनाआधी जाहिराती कशा केल्या जात याची काही आकर्षक उदाहरणे त्यात आहेत.