News Flash

सेवाध्यास : दीपस्तंभ

‘दीपस्तंभ फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेचे मनोबल व संजीवन प्रकल्प विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत आहेत

श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

आधाराबरोबरच मिळणारे मार्गदर्शन हे देखील तितकेच महत्त्वाचे असते, जे मनाचे बळही वाढवते आणि दिशादर्शकही होते. दिशा देण्याबरोबरच सुयोग्य मार्गदर्शन करणारे आणि आधारही देणारे असे ‘दीपस्तंभ फाउंडेशन’. जे फाउंडेशन अनेक अपंग आणि अनाथांना प्रेमाचा हात देते, त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी जिद्द देते. त्याबरोबरच कौशल्य प्रशिक्षण, निवास व्यवस्थाही फाउंडेशनमार्फत केली जाते.

अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांना मोफत निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या ‘दीपस्तंभ फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेचे मनोबल व संजीवन प्रकल्प विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत आहेत. २७ मार्च २००५ ला दीपस्तंभची स्थापना झाली. ग्रामीण भागातील गरीब होतकरू आणि आदिवासी युवकांचे भवितव्य घडवण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या प्रकल्पाकडे तळागाळातल्या, आदिवासी पाडय़ावरच्या तरुणाईची पावले वळू लागली. दीपस्तंभचे यथोचित मार्गदर्शन, निवास-भोजन व्यवस्था, अभ्यासक्रमाची मुबलक पुस्तके, जोडीला आपलेपणाची भावना आणि विद्यार्थ्यांची अथक मेहनत यांचा एकत्रित परिणाम समोर येऊ  लागला. या संस्थेतून बाहेर पडलेले पाचशेहून अधिक विद्यार्थी विविध सरकारी पदावर देशभर कार्यरत आहेत, त्यामध्ये या फाउंडेशनचा खूप मोठा वाटा आहे.

दरम्यान, अठरा वर्षांवरील अनाथ विद्यार्थ्यांचा प्रश्न फाउंडेशनच्या समोर ठाकला. कुठल्याही अनाथ आश्रमात वयाच्या अठरा वर्षांपर्यंत ही मुले राहू शकतात, म्हणजे ऐन महत्त्वाच्या टप्प्यावर पुन्हा आता कुठे जायचे आणि पुढे काय करायचे, हा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो. या समस्येच्या गर्तेत सापडलेल्या अनाथांचा नाथ होण्याचा निर्णय दीपस्तंभने घेतला. आम्ही काय करावं? या प्रश्नासह करिअरच्या शोधात असणारी काही दिव्यांग मुले आढळली. या दोन्ही घटकांच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अनाथांसाठी संजीवन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मनोबल या प्रकल्पाची निर्मिती झाली.

हा प्रकल्प सुरुवातीला जळगाव येथे सुरू झाला होता. या प्रकल्पातून आजवर अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत, बँकेमध्ये, रेल्वेमध्ये रुजू झालेत. हे यश व विद्यार्थ्यांची संख्या बघता १ जुलै २०१८ पासून हा प्रकल्प पुण्यातही सुरू झाला आहे. महाराष्ट्राशिवाय पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशातून ही विद्यार्थी स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातुन आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मनोबल प्रकल्पात दाखल झाले आहेत. फेब्रुवारी २०१९ च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत जळगाव येथील दोन विद्यार्थी आणि पुण्यातील एक विद्यार्थी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. बरेच विद्यार्थी या यशाच्या जवळपास येऊ न पोहोचले आहेत.  आपल्या देशाचे पहिले दृष्टिबाधित जिल्हाधिकारी कृष्णगोपाल तिवारी, महिलांचे नाव उंचावणाऱ्या दृष्टिबाधित जिल्हाधिकारी प्रांजल पाटील आणि अल्पना दुबे या दीपस्तंभच्या मार्गदर्शक आहेत. अनेक विद्यार्थ्यांना दीपस्तंभच्या प्रकल्पांसाठी साहाय्यही करायचे आहे तर अनेकांना या प्रकल्पांचा सुविधांचा लाभही घ्यायचा आहे. अशा विद्यार्थ्यांना येथे प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश दिला जातो.

जळगावबरोबरच आता पुण्यातही दृष्टिबाधित, अस्थिव्यंग आणि अनाथ मुलांना या प्रकल्पांतर्गत उच्च शिक्षण घेणे शक्य झाले आहे. संस्थेतर्फे दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम ध्वनिमुद्रित करून देण्यात येतो. तसेच प्रत्येकाला संगणक प्रशिक्षणही दिले जाते. उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप व अभ्यासासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाते. सर्व क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींशी संवाद साधण्याची आगळी वेगळी संधी या प्रकल्पांतर्गत या विद्यार्थ्यांना मिळते. विषयानुसार तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनही या विद्यार्थ्यांना केले जाते. अवांतर वाचनाची आवड व गरज बघता सर्व पद्धतीने (ब्रेल, ऑडिओ, पीडीएफ, ई बुक ) त्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे या सर्व सुविधा निवास-भोजन, नाश्ता यांसह विनामूल्य दिल्या जातात. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने नुकतीच एक शाळा या प्रकल्पाकरिता दिली असून जवळपास ६० मुला-मुलींची निवास व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याशिवाय अजून २५ विद्यार्थ्यांना येथे प्रवेश देण्यात येईल. १ जुलैपासून या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि उच्चशिक्षण घेणाऱ्या अपंग, अनाथ, आदिवासी आणि ग्रामीण भागातील गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्थाही करण्यात आली आहे. या प्रकल्पाला भेट द्यायची असेल किंवा या प्रकल्पांतर्गत काही मदतीचा हात पुढे करायचा असेल, तर यासाठी प्रकल्प व्यवस्थापक मंजुश्री कुळकर्णी यांच्याशी ९८५०३२२६७८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी विविध परीक्षा देण्यासाठी पुण्यात येतात, पण त्यांना राहण्याची सोय नसल्याने अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. ही समस्या मनोबल प्रकल्पाने दूर केली आहे. अपंग आणि अनाथ विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 3:27 am

Web Title: ngo deepstambh foundation pune information zws 70
Next Stories
1 ‘लोकसत्ता’च्या रेश्मा शिवडेकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार
2 ‘सीटीईटी’चा निकाल जाहीर
3 ‘पुणे-मुंबई हायपरलूप’ला पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता
Just Now!
X