News Flash

चिमुकल्या भाचे मंडळींची मामाच्या गावची सफर रंगली

सेवा मित्र मंडळातर्फे गणेश मंदिर वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला जातो.

रंगीबेरंगी टोप्या, तोंडाला मुखवटे.. घोडागाडीमध्ये बसून फिरण्याची मजा.. मिकी माऊस, डोनाल्ड डकशी हस्तांदोलन करताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमललेले निरागस हास्य आणि कठपुतळीचा खेळ पाहत बाहुल्यांच्या तालावर ठेका देणारे चिमुकले.. असे उत्साही वातावरण शुक्रवार पेठेत गुरुवारी अनुभवायला मिळाले. उन्हाळ्याच्या सुट्टीतील हरविलेली मामाच्या गावाला जाण्याची मजा समाजातील अनाथ आणि वंचित मुलांना अनुभवायला मिळावी, यासाठी ‘मामाच्या गावची सफर’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले.
सेवा मित्र मंडळातर्फे गणेश मंदिर वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला जातो. या वेळी महापौर प्रशांत जगताप, चंद्रशेखर दैठणकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. आबासाहेब शिंदे, अ‍ॅड. शिरीष शिंदे, उदय जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. अनाथ मुलांसाठी काम करणारी माहेर, देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी काम करणारी वंचित विकास आणि एकलव्य न्यास, रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसाठी काम करणारे बचपन वर्ल्ड फोरम, दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी काम करणारी संतुलन पाषाण या संस्थांमधील तब्बल दोनशे मुले पुण्यामध्ये तीन दिवस मामाच्या घरी आली आहेत. उपक्रमाचे यंदा सतरावे वर्ष आहे. सेवा मित्र मंडळ चौकात या चिमुकल्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी मिकी माऊस सोबत गाण्यांच्या तालावर चिमुकले मनसोक्त नाचले. उंट आणि घोडय़ावरून रपेट मारत चॉकलेट खाण्याचा आनंद देखील त्यांनी लुटला. पुढील दोन दिवस या मुलांसाठी विविध स्पर्धा, सहली, ऑस्केस्ट्रा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष तन्मय तोडमल, विक्रांत मोहिते, सचिन ससाणे, कालिदास पंडित, प्रशांत जाधव, रोहन जाधव यांनी उपक्रमाचे आयोजन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 4:37 am

Web Title: ngo organizing various competitions trips for orphaned childrens
टॅग : Orphan
Next Stories
1 विद्यार्थी सुधारित प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेतच
2 खासगी गुप्तहेर सेवेच्या नावाने अनेकांची फसवणूक
3 ‘एचआयव्ही’वरील ‘सेकंड लाईन’ औषधांबाबत पुन्हा आश्वासनेच?
Just Now!
X