30 October 2020

News Flash

Coronavirus : प्रशासनाच्या मदतीला एनआयसीची संगणकप्रणाली

टाळेबंदी काळात एकापेक्षा जास्त जणांशी संपर्क पद्धतीचा देशभरात वापर

टाळेबंदी काळात एकापेक्षा जास्त जणांशी संपर्क पद्धतीचा देशभरात वापर

पुणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सरसकट बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांकडूनही सामाजिक अंतराचा नियम पाळण्यात येत आहे. या काळात एकापेक्षा जास्त जणांशी संपर्क साधण्यासाठी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राकडून (नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटर – एनआयसी) तयार करण्यात आलेल्या संगणकप्रणालींचा पुण्यासह राज्यात आणि देशभरात वापर करण्यात येत आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने प्रशासनाला अनेक संगणकप्रणाली विविध कामांकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत. करोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडल्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे दररोज प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करत होते. मात्र, पुण्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दररोज होणारी पत्रकार परिषद बंद करण्यात आली. त्याऐवजी वृत्तपत्रांना दररोज प्रसिद्धीपत्रकांद्वारे माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांना व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी एनआयसी पुणेकडून विशेष संगणकप्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रणालीद्वारे डॉ. म्हैसेकर दररोज पत्रकारांना केवळ पुण्यातील नव्हे, तर पुण्यासह पुणे विभागाच्या सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा पाचही जिल्ह्य़ांतील करोनाबाबत प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, करोनाबाधितांची संख्या, भाजीपाला, दूध पुरवठा यांची होणारी आवक याबाबत माहिती देत आहेत.

याबाबत एनआयसी पुणेचे अधिकारी धनंजय कुलकर्णी म्हणाले, विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या कार्यालयाकडून व्हीडीओ कॉन्फरन्स घेण्याबाबत एनआयसीच्या पुणे कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार आधीच अस्तित्वात असलेली आणि अनेक ठिकाणी वापरण्यात येणारी संगणकप्रणाली त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीचा दुवा विभागीय आयुक्तालयाकडे पाठवण्यात आला असून त्याद्वारे ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधू शकत आहेत. याबरोबरच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्य़ात सरसकट बंदी लागू करण्यात आली आहे.

या काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या मालवाहू वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून (आरटीओ) ‘ई-पास’ देण्यात येत आहेत. त्याकरिता स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले आहे. ही सेवा देखील एनआयसीकडून तयार करून देण्यात आली आहे. राज्यातील तब्बल ५० आरटीओंना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 12:47 am

Web Title: nic tech solutions helping govt combat covid 19 crisis zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 अघोषित नाकाबंदीमुळे पुण्यात सामान्यांचे हाल
2 Coronavirus lockdown : घराबाहेर न पडता लघुपट निर्मितीचे आव्हान
3 Coronavirus: पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाबाधित व्यक्तीचा पोलीस ठाण्यात संचार
Just Now!
X