नर्मदा परिक्रमेच्या मार्गावर भाविकांना सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या रहिवाशांना मदत करण्यासाठी निनाद, पुणे संस्थेने संकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी संस्थेने  http://www.narmdapaikrama.org हे संकेतस्थळ विकसित केले आहे.
संस्थेने नुकत्याच घेतलेल्या संकेतस्थळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात ६० हजार रुपये जमा झाले आहेत. परिक्रमा मार्गावरील ठाड पठार येथील कमल साहू, बायडीपुरा येथील त्र्यंकबेश्वर राव आणि शूलपाणी जंगलामध्ये वाटाडय़ा म्हणून मदत करणारे हिरालाल रावत यांना अर्थसाह्य़ केले जाणार आहे. या सर्वाच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. कुंडी या गावी किरण डोंगरे या महिला पुढच्या गावात भिक्षा मागून मिळालेल्या धान्यातून आपल्याकडे आलेल्या परिक्रमावासीयांना भोजन करून देतात. अशा प्रकारे भाविकांना मदत करण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा संस्थेने शोध घेतला असून भविष्यामध्ये या सर्वाना पुण्यातून जमा होणारी रक्कम आणि वस्तुरूपात मदत केली जाणार असल्याची माहिती उदय जोशी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अॅड. वेंकटेश शास्त्री आणि मििलद शिरगोपीकर उपस्थित होते.