महाराष्ट्र, गोवा आणि दीव-दमणमध्ये अंमलबजावणी होणार

राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्थेच्या (एनआयओएस) पुणे विभागाने शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी ‘मास्टरप्लॅन’ तयार केला आहे. त्यात महाराष्ट्र, गोवा आणि दीव-दमणमध्ये अभ्यास केंद्रांची संख्या वाढवणे, कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे वाढवण्यावर भर दिला जाईल.

एनआयओएसच्या पुणे केंद्रात महाराष्ट्र, गोवा या राज्यांसह दीव-दमण या केंद्र शासित प्रदेशांचा समावेश होतो. गेल्या तीन वर्षांमध्ये एनआयओएसच्या अभ्यासक्रमांसाठी पुणे विभागीय केंद्रातील विद्यार्थ्यांची नोंदणी बरीच कमी झाली आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास धोरणानुसार एनआयओएसने बेकरी अँड कन्फेशनरी, हाऊस किपिंग, वेब डेव्हलपमेंट, योगा, हस्तकला असे अनेक अभ्यासक्रम सुरू केले. मात्र, या अभ्यासक्रमांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे एनआयओएसच्या पुणे विभागीय संचालक डॉ. सौम्या राजन यांनी महाराष्ट्र, गोवा आणि दीव-दमणमध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठीचा ‘मास्टरप्लॅन’ तयार केला आहे. त्यात पारंपरिक शिक्षणासह कौशल्य विकासावर भर देण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी लगेचच सुरू करण्यात येणार आहे.

एनआयओएसचे अभ्यासक्रम अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्याबरोबरीने प्रवेश वाढवणे हे उद्दिष्ट ठेवून हा आराखडा तयार केला आहे. विद्यार्थी आणि पालकांना सहायक सेवा प्रभावी पद्धतीने देणे महत्त्वाचे आहे. कारण पालक आणि विद्यार्थ्यांना झटपट मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. नव्या नियोजनामध्ये अभ्यासकेंद्र वाढवण्यात येतील. त्यात सध्याच्या केंद्रांमध्ये ३० ते ५० केंद्रांची वाढ करण्यात येईल. या मास्टरप्लॅनमध्ये पूर्व महाराष्ट्रावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास धोरणानुसार व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या वाढवली जाईल. तसेच झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना जोडून घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना स्वतच्या पायावर उभे करण्यासाठी कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम शिकवले जातील. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांना एनआयओएसशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती डॉ. राजन यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.