राष्ट्रीय मुक्त विद्यालयाच्या (एनआयओएस) उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून एनआयओएससाठी महाराष्ट्रातूनही प्रतिसाद वाढला आहे.
विद्यार्थ्यांना काम करताना शिकता यावे, त्यांच्या व्यवसायानुसार, त्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्यांसह नियमित शिक्षण घेण्याची संधी एनआयओएस विद्यार्थ्यांना देते. राज्य, केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंडळांप्रमाणेच एनआयओएसला देखील मान्यता आहे. या मंडळाच्या उच्च माध्यमिक म्हणजे बारावीच्या परीक्षेला समकक्ष असणाऱ्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेसाठी देशातून १ लाख ८३ हजार ७३३ विद्यार्थी बसले होते. त्यातील ७१ हजार ४८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचप्रमाणे या परीक्षेत विविध विषय आणि कौशल्ये घेऊन ७ लाख २८ हजार ३४१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४ लाख ७८ हजार १६६ म्हणजे ६५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. http://www.nios.ac.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

‘टीईटी’ची पुनर्परीक्षा शांततेत
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) रद्द झालेल्या भागाची परीक्षा मंगळवारी राज्यभर शांततेत पार पडली असून साधारण दीड लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली.राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेची भाग दोनची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. मूळ परीक्षा झाल्यानंतर अखेर सहा महिन्यांनी राज्यभरात मंगळवारी टीईटी घेण्यात आली. १ लाख ४० हजार उमेदवारांनी टीईटी दिली आहे.