30 September 2020

News Flash

गोधडी नि घोंगडी जपू द्या की रं.!

पुण्यातील तरुणाचा कलेच्या दस्तावेजीकरणाचा वसा

पुण्यातील तरुणाचा कलेच्या दस्तावेजीकरणाचा वसा

पुणे : रक्त गोठवणाऱ्या थंडीत ऊब देणारी गोधडी आणि घोंगडी ही अस्सल भारतीय वस्त्रे तयार करण्याची हस्तकला लोप पावत आहे. हे निदर्शनास येताच तिचे संवर्धन करून विणकरांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा वसा एका अभियंता तरुणाने घेतला आहे.

नीरज बोराटे असे या अभियंत्याचे नाव. तो पुण्यातला. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचे मन नोकरीत रमेना. आवड जपण्याचा एक भाग म्हणून नीरजने गोधडी आणि घोंगडी या पारंपरिक भारतीय वस्त्रांचे आणि ती विणण्याच्या कलेचे दस्तावेजीकरण सुरू केले. देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक प्रकारे गोधडी आणि घोंगडी शिवली जाते, मात्र कालौघात ती कला लोप पावत आहे. हे थांबवण्यासाठी नीरज सरसावला आहे.

‘मदर क्विल्ट’ आणि ‘घोंगडी डॉट कॉम’ या दोन संकेतस्थळांच्या माध्यमातून नीरजने अनेक राज्यांतील गोधडी आणि घोंगडी विणकरांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यांनी तयार केलेल्या गोधडी आणि घोंगडीला युरोप, जर्मनी, दुबई आदी देशांतून मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे, गोधडी आणि घोंगडी यांना आधुनिक रूप देऊन तयार केलेल्या ‘अ‍ॅक्सेसरीज’ नाही देश-परदेशातील ग्राहकांची पसंती मिळत आहे. आपल्या उपक्रमाविषयी माहिती देताना नीरज म्हणाला, ‘गोधडी हे केवळ एक पांघरुण नाही. प्रत्येक घरात, राज्यात शिवल्या जाणाऱ्या गोधडीची गोष्ट आणि संदर्भ वेगळा असतो. तमिळनाडूतील निलगिरी प्रांतात ‘तोडा’ जमातीतील कलाकार लाल, पांढऱ्या आणि काळ्या धाग्यांचा वापर करून शिवत असलेली गोधडी हा कलेचा उत्तम नमुना आहे. विशेष म्हणजे एक कलाकार वर्षांला दोनच गोधडय़ा शिवतात.’

भारतीय कापड किंवा गोधडीचे टाके यातील कोणताही समान दुवा ठेवून ग्राहकांच्या आवडीप्रमाणे पड५दे, उशांचे अभ्रे, गालिचेही बनवले जातात. पारंपरिक पद्धतीने विणल्या जाणाऱ्या घोंगडीचे संदर्भ लोककथा आणि लोकगीतांमध्ये आढळतात, मात्र माहितीचा स्रोत असलेल्या इंटरनेटवर त्याचा साधा उल्लेखही नव्हता. हे पाहून ‘घोंगडी डॉट कॉम’ची सुरुवात केली, असे नीरजने सांगितले.

आरोग्यदायी आणि आध्यात्मिकही!

घोंगडीला आध्यात्मिक महत्त्व आहे. ती आरोग्यदायीही आहे. तिचे उपयोगही अनेक आहेत. घोंगडीवर झोपल्याने रक्ताभिसरण सुधारते, पाठदुखी, कंबरदुखी किंवा इतर स्नायूंचे दुखणे उद्भवत नाही. विशेष म्हणजे, परदेशातून गोधडी आणि घोंगडीला मागणी आहे. ही दोन्ही वस्त्रे विणण्याच्या कला जपल्या जाव्यात यासाठी त्यांचे प्रत्येक स्तरावर दस्तावेजीकरण करण्याचा प्रयत्न आहे. ते दृष्य आणि लिखित स्वरूपात करण्यात येत असल्याचे नीरजने सांगितले.

कलाकारांच्या पुनरुज्जीवनासाठी!

गोधडी शिवणे आणि घोंगडी विणणे या दोन्ही गोष्टी भारतीय हस्तकलेत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र बदलत्या काळाबरोबर या कलेचा वारसा चालवणाऱ्या नव्या कलाकारांची संख्या कमी होत आहे. गोधडी आणि घोंगडीची बाजारपेठ विस्तारल्यामुळे, त्यांना उत्तम भाव मिळेल. त्यामुळे नव्या पिढीतील कलाकार या कलेकडे पुन्हा वळतील या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे नीरजने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 3:49 am

Web Title: niraj borate craft of ghongadis ghongadi dot com zws 70
Next Stories
1 डीएसके प्रकरणातील ठेवीदार ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या
2 पुण्यात नीचांकी तापमानाची नोंद
3 मेट्रोच्या  विस्तारास मंजुरी
Just Now!
X