विशेष मुलांचे ओझे न मानता समाजाने माणुसकीच्या भावनेतून त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा विशेष प्रौढ मुलांसाठी कार्यरत असलेल्या ‘नवक्षितिज’ संस्थेच्या डॉ. नीलिमा देसाई यांनी शनिवारी व्यक्त केली. या मुलांना केवळ सहानुभूती नको तर, समाजाचे सन्मानपूर्वक सहकार्य मिळाले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
वंचित विकास संस्थेतर्फे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर आणि गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांच्या हस्ते डॉ. नीलिमा देसाई यांना निर्मळ रानवारा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी निर्मळ रानवारा मासिकासाठी विशेष योगदान देणाऱ्या आम्रपाली जाधव, सोनाली शिंदे, कानन वीरकर, सहिता गोंधळेकर, नूपुर दिवेकर, ऋतिका गवते, मानसी थोरात, गौरी लोणकर आणि देवराज राठोड या बालकांना इंदिरा गोविंद पुरस्काराने गौरविण्यात आले.
देसाई म्हणाल्या, वयात येणाऱ्या विशेष मुलांच्या संगोपनासाठी केवळ सुरक्षित कौटुंबिक वातावरण पुरेसे नसते. समवयस्क मित्र-मैत्रिणींच्या सहवासातून अशा मुलांना व्यक्त होण्याची संधी मिळाल्यावर त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलते. याच स्वानुभवातून आपल्या मुलीबरोबरच समाजातील ४१ विशेष मुलांसाठी नवक्षितिज संस्था कार्यरत झाली आहे.
मुलांच्या कलाविष्कारातून त्यांची स्वतंत्र वृत्ती फुलते, असे शोभा भागवत यांनी सांगितले. इतरांच्या आनंदामध्ये समाधान मानण्याच्या वृत्तीतूनच स्वयंसेवी संस्थांचे कार्य जोपासले जाते, असे मत मीना चंदावकर यांनी व्यक्त केले. ललितागौरी डांगे यांनी प्रास्ताविक केले. सोनाली मेढेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीराम ओक यांनी आभार मानले.