‘सेवा सहयोगा’तून पालखी सोहळय़ात ‘निर्मल वारी अभियान’
फिरत्या शौचालयांचा वापर करण्यासंदर्भात वारकऱ्यांचे प्रबोधन
‘पाहू द्या रे मज विठोब्बाचे रूप’ असे म्हणत मुखी विठ्ठलनामाचा गजर आणि हाती टाळ-मृदंगाच्या तालावर नर्तन करणारे वारकरी श्री क्षेत्र आळंदी आणि देहू येथून प्रस्थान ठेवलेल्या पालखी सोहळ्यासमवेत बुधवारी (२९ जून) पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहेत. या पालखी सोहळ्याचे उत्साहामध्ये स्वागत करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पालखी मार्गावरील गावांमध्ये स्वच्छता राहावी आणि रोगराईला थारा मिळू नये यासाठी निर्मल वारी अभियान राबविण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी नागरिक, स्वयंसेवी संस्थांसह स्थानिक स्वराज्य संस्था सज्ज झाल्या असून टपाल विभागातर्फे वारीतील संस्मरणीय क्षण पोस्टकार्डावर देणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संतशिरोमणी तुकाराममहाराज पालखी सोहळय़ामध्ये यंदाही ‘निर्मल वारी अभियान’ राबविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर प्रातर्विधीसाठी फिरत्या शौचालयांचा वापर करण्यासंदर्भात ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’चे दहा हजार स्वयंसेवक वारकऱ्यांचे प्रबोधन करणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदी आणि देहू येथून प्रस्थान ठेवणाऱ्या पालख्यांसमवेत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी रवाना होत आहेत. वारीमध्ये पुरुष आणि महिला वारकऱ्यांची संख्या खूप असते. जास्त दिवसांचा प्रवास असल्यामुळे पालखी सोहळा मार्गावरील वेगवेगळय़ा गावांमध्ये मुक्काम करतो. प्रातर्विधीसाठी गावामध्ये शौचालयांची सोय नसल्यामुळे अनेकांना उघडय़ावरच शौचास बसावे लागते. त्यामुळे या गावाजवळचा परिसर दूषित होत असतो. त्यामुळे परिसरामध्ये विविध आजारांची लागण होत असते. हे टाळण्यासाठी वारीमध्ये या वर्षीही ‘निर्मल वारी अभियान’ राबविण्यात येणार आहे.
वारी मुक्कामाच्या प्रत्येक गावामध्ये राज्य सरकारतर्फे तात्पुरती आणि फिरती शौचालये लावली जाणार आहेत. सेवा सहयोग स्वयंसेवकांमार्फत वारकरी प्रबोधनाचे कार्य केले जाणार आहे. वारकऱ्यांनी प्रातर्विधीसाठी या शौचालयांचा वापर करावा यासाठी िदडीप्रमुखांची भेट घेऊन आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून पालखी पुढे गेल्यावर गावांमध्ये कोणत्याही प्रकारची घाण किंवा आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही. निर्मल वारी उपक्रमामध्ये नागरिकांनी प्रत्यक्ष सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

निर्मल वारी अभियानाची वैशिष्टय़े
* २५ पेक्षा अधिक सेवा संस्थांचा सहभाग
* स्वयंसेवकांमध्ये सुमारे पाच हजार महाविद्यालयीन विद्यार्थी
* बारा-बारा तासांच्या पाळीमध्ये स्वयंसेवकांचे सेवा कार्य
* सर्व गावांतून सर्वेक्षणाचे काम पूर्ण
* सर्व वारकरी दिंडय़ांमधून उत्तम सहकार्य

नागरिकांनी अर्थसाहाय्य करावे
स्वयंसेवकांना वाहतूक, चहा, भोजनाचा खर्च देऊन आर्थिक मदत करावी. या उपक्रमातील एका कार्यकर्त्यांचा एका मुक्कामाचा खर्च पाचशे रुपये आहे. पुणेकरांच्या सहकार्यामुळे निर्मल वारीचे कार्य यशस्वी होईल आणि या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ आणि निर्मल भारत उभा राहील.
– प्रदीप रावत (सेवा सहयोग फाऊंडेशनचे विश्वस्त)