यूपीएच्या काळात जे अर्थमंत्री होते तेच चोरीत माहीर आहेत अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुण्यात केली. पी. चिदंबरम यांच्या आयएनएक्स घोटाळा प्रकरणी त्यांनी हा टोला लगावला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. चोर, चोरी यावरुन वक्तव्य करुन राहुल गांधी यांनी देशाची दिशाभूल केली आहे. आरबीआयच्या पैशांची चोरी सरकार करत असल्याचंही त्यांनी म्हटलं मात्र त्यांनी अशी वक्तव्य केली की जनताच त्यांना उत्तर देते तरीही त्यांची आरोप करण्याची हौस फिटत नाही असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर यूपीएच्या कार्यकाळात जे अर्थमंत्री होते तेच चोरीत माहीर होते असा टोलाही त्यांनी चिदंबरम यांचं नाव न घेता लगावला आहे.

राहुल गांधी यांनी आरबीआयच्या निधीबाबत जे वक्तव्य केलं आहे त्याची मी पर्वा करत नाही असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या जीएसटी आणि सीमा शुल्क कार्यालयातर्फे एएफएमसी सभागृहात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यावर निशाणा साधला.