ग्रामीण विद्यार्थी, महिलांचा आधार काळाच्या पडद्याआड

ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी गेली चार दशके काम केलेल्या ‘वनस्थळी’ संस्थेच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां निर्मलाताई बळवंत पुरंदरे (वय ८६) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी, तर पुरंदरे प्रकाशनचे अमृत पुरंदरे, प्रसिद्ध गायिका-लेखिका माधुरी पुरंदरे आणि थिएटर अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांच्या त्या मातोश्री होत. गेल्या काही वर्षांपासून निर्मलाताई आजारी होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या. शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. विद्यार्थी सहायक समिती आणि फ्रान्स मित्र मंडळाच्या माध्यमातून निर्मलाताई पुरंदरे यांनी मोलाचे योगदान दिले होते. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आदिशक्ती पुरस्कार आणि सावित्रीबाई पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

निर्मलाताई यांचा जन्म ५ जानेवारी १९३३ रोजी झाला. त्या माहेरच्या माजगावकर. ‘माणूस’ साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर आणि ‘राजहंस प्रकाशन’चे दिलीप माजगावकर यांच्या त्या भगिनी होत. पुरंदरे यांनी पुणे जिल्ह्य़ातील आयआयएम ट्रस्टच्या माध्यमातून फुलगाव येथे निराश्रित विद्यार्थ्यांसाठी बाल सदनाची स्थापना केली होती.

गेल्या चार दशकांपासून अव्याहतपणे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांसाठी सर्वस्व देऊन झटणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून त्यांनी खेडय़ा-पाडय़ांतील अनेक हातांना एकत्र बांधले. मात्र, केवळ बालसदन किंवा बालवाडी निर्माण करून त्या थांबल्या नाहीत, तर तिथे शिकविण्यासाठी शिक्षिकासुद्धा तयार केल्या पाहिजेत, हे ओळखून त्यांनी तेथील महिलांसाठी सहा महिन्यांचा बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण वर्ग सुरू केला. त्यातूनच वनस्थळी संस्थेचे कार्य विस्तारले. तसेच हे प्रशिक्षण वर्गाचे जाळे विस्तारल.

त्यांच्या या कार्याची महती ग्रामीण भागांत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांला चांगलीच परिचित आहे. डॉ. अच्युतराव आपटे यांनी स्थापन केलेल्या विद्यार्थी सहायक समितीमध्ये निर्मलाताई सुरुवातीपासूनच सक्रिय होत्या. ग्रामीण भागातून मोठय़ा शहरांमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्यांची त्यांना जाणीव होती. स्नेहयात्रा हे त्यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक प्रसिद्ध आहे.