निसर्ग चक्रीवादळाचे पडसाद पुण्यातही उमटण्याची शक्यता आहे. वादळामुळे पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ७० किमी असणार आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असून पुणे जिल्ह्यात देखील लोकांनी सुरक्षित ठिकाणी रहावे असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान मुंबईवरील धोका टळला असून चक्रीवादळाची दिशा आता पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक या मार्गाने जाणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान संशोधक डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

निसर्ग वादळाने आता महाराष्ट्राची किनारपट्टी ओलांडली असून हे वादळ आता थोडे ईशान्येकडे सरकू लागले आहे. दुपारी १२:३३ ते २:३० या काळात अलिबागला धडकलेल्या या वादळानं रौद्र रूप धारण केलं होतं. या काळात अलिबागला १०० ते ११० किमी प्रति तास या वेगानं वारे वाहू लागले होते. काही वेळा तर वाऱ्याचा वेग १२० किमी प्रति तास अशा भीतीदायक पातळीवर पोहोचला होता.

दुपारी अडीच वाजता हे वादळ मुंबईपासून ७५ किमी अंतरावर तर तर पुण्याच्या पश्चिमेला ६५ किमी अंतरावर होतं. भारतीय हवामान खात्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.