महापालिका आणि नगरविकास विभागाने कागदपत्रांची पूर्तता वेळेत न केल्यामुळेच पुणे मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे वेळेत सादर झालेला नाही. या अपयशाचे खापर केंद्राच्या माथी मारू नका, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सोमवारी टोला लगावला. पुणे मेट्रोचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यासाठी स्वत: लक्ष घालेन, असेही त्यांनी सांगितले.
पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पाचे प्रस्ताव एकाच वेळी दाखल झाले होते. मात्र, नागपूरच्या प्रस्तावाला प्राधान्याने मान्यता देत केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यासंदर्भात नागपूरचा खासदार असताना नागपूर मेट्रोसाठी प्रयत्न करण्यामध्ये गैर काय, असा सवाल गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
नागपूर येथील मेट्रो प्रकल्पासाठी नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट ही संस्था काम करीत आहे. या ट्रस्टने प्रकल्पासाठीच्या सर्व अटी आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळाली असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्पासाठी महापालिका आणि नगरविकास विभाग यांनी प्रस्ताव दाखल करणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री हेच नगरविकास विभागाचे प्रमुख असल्याने त्यांनी लक्ष घालून सर्व बाबींची पूर्तता करणे गरजेचे होते. मात्र, मुख्यमंत्री किती गतीने काम करतात याविषयी मी काही बोलणे योग्य होणार नाही. मुख्यमंत्री दोन महिन्यांत व्यंकय्या नायडू यांना भेटले नाहीत की त्यांनी प्रकल्प अहवाल देखील सादर केला नाही. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय हेतूने टीका करण्याची त्यांची भूमिका दिसते.