केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे मत

समाजाला दृष्टी देण्याचे काम साहित्य करते. त्यामुळे राजकीय सत्तेपेक्षाही साहित्याचे स्थान श्रेष्ठ आहे. सत्ता उलथवून टाकण्याची क्षमता ही केवळ साहित्यामध्येच असते, असे मत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. इतिहास, साहित्य आणि संस्कृती यांच्या मिलाफातून मूल्याधिष्ठित समाज घडू शकेल, असेही ते म्हणाले.

सरहद संस्थेतर्फे आयोजित पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. सुरजितसिंग पातर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, गिरीश गांधी, संजय नहार, भारत देसडला, संतसिंग मोखा या वेळी उपस्थित होते. चित्रपट अभिनेते धर्मेद्र, उज्जल दोसांजा, रज्वी शिंदे, एस. एस. विर्क, केवल धीर, पी. एस. पसरिचा, त्रिलोचन सिंग, डॉ. एस. पी. ओबेरॉय आणि अमरावतीच्या महापौर चरणजित कौर नंदा यांना विश्व पंजाबी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील सांस्कृतिक अनुबंध पातर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उलगडला. ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ या संत तुकारामांच्या काव्याचा संदर्भ देत पातर म्हणाले, शब्द हे रत्न, मोती आणि हिरे असतात. त्याप्रमाणेच शब्द हे हत्यारदेखील ठरू शकतात. माणसाचे दु:ख हलके करून त्याला अंधाराकडून प्रकाशाची वाट दाखविण्याचे सामथ्र्य साहित्यामध्ये असते.

पंजाबी भाषेतून संवाद साधत फडणवीस यांनी श्रोत्यांना जिंकले. शालेय स्नेहसंमेलनात गुरू गोविंदसिंग यांच्या जीवनावरील नाटकात मी आणि माझ्या मोठय़ा भावाने भूमिका केली होती, या आठवणींना उजाळा दिला. अभिव्यक्त होण्यासाठी भाषा हेच माध्यम असले तरी साहित्याला भाषेचे बंधन असता कामा नये, असे सांगून फडणवीस म्हणाले, पंजाबी साहित्याने चिरंतन विचार दिले आहेत. हे विचार अनुवादित करून पोहोचविले तर पंजाबी साहित्याची छाप सर्व भाषांमध्ये उमटेल. गुरू गोविंदसिग यांनी खालसा पंथाची स्थापना करताना शौर्याबरोबर विवेक, ताकदीबरोबर ममता आणि हिमतीच्याजोडीला संयम यांची सांगड घातली. पंजाबी आणि मराठी माणसांमध्ये हे गुण समान आहेत.

स्वातंत्र्यलढा, सैन्यदल आणि शेती या तीन क्षेत्रात देशामध्ये महाराष्ट्र आणि पंजाब या दोन प्रांतांचे मोठे योगदान असल्याचे पवार यांनी सांगितले. गुरू ग्रंथसाहिब, गुरू नानक आणि गुरू गोविंदसिंग यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे सांगून पवार यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये हे संमेलन होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

‘महाराष्ट्रानं मला कुशीत घेतलं’

महाराष्ट्र आणि पंजाबचं नातं अजरामर आहे. पंजाबच्या या मुलाला मुंबई आणि महाराष्ट्रानं आईप्रमाणं कुशीत घेतलं, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांनी व्यक्त केली. गरीब शेतकऱ्याच्या घरात माझा जन्म झाला. जीवनामध्ये काही करावं ही आशा-आकांक्षा होती. मला आकाशाला गवसणी घालायची होती. हे आकाश मला महाराष्ट्राच्या भूमीत मिळालं. लोकांच्या प्रेमामुळेच माझी सभ्यता टिकून आहे, असेही धर्मेद्र यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री, गडकरी यांच्या उपस्थितीत महेश लांडगे समर्थकांचा भाजप प्रवेश

भोसरीत २७ नोव्हेंबरला लांडगे यांचे शक्तिप्रदर्शन

प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालवली आहे. लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त (२७ नोव्हेंबर) होणाऱ्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री भोसरीत येत असून, त्यांच्या उपस्थितीतच लांडगे समर्थक नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.

महेश लांडगे राष्ट्रवादीचे बंडखोर म्हणून निवडून आले होते. भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर ते भाजपशी संलग्न राहिले होते, मात्र स्थानिक राजकारणात ते राष्ट्रवादीच्या गोटात वावरत होते. दोन वर्षांच्या ‘तळय़ात-मळय़ात’च्या खेळानंतर त्यांनी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे भाजप प्रवेश केला. त्यांचे समर्थक अद्याप आपापल्या पक्षातच आहेत. त्यात बहुतांश समर्थक राष्ट्रवादीत आहेत. या सर्वाचा भाजप प्रवेश लांडगे यांच्या वाढदिवशी २७ नोव्हेंबरला होणार आहे. यानिमित्ताने ‘व्हिजन २०-२०’, राजकीय मेळावा आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी नेते भोसरीत येणार आहेत. त्यांच्या साक्षीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी आमदार लांडगे यांनी केली आहे. भोसरीच्या लांडगे नाटय़गृहाशेजारील मैदानात लाखभर नागरिक जमा करण्याचा निर्धार लांडगे समर्थकांनी केला आहे. जेव्हा महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली, तेव्हा सर्वानाच धक्का बसला होता. आता त्यांचे राष्ट्रवादीतील समर्थकही भाजपमध्ये येणार असल्याने राष्ट्रवादीला पुन्हा धक्कातंत्राचा अनुभव येणार आहे. या पक्षांतरामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.