नितीन गडकरी यांचे मत

साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलशाही यापेक्षा व्यक्ती हीच या समाजाचा केंद्रबिंदू असते. संस्काराद्वारे व्यक्ती परिपूर्ण होत नाही, तोवर समाज आणि राष्ट्रामध्ये बदल होत नाहीत, असे डॉ. हेडगेवार आणि दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगून ठेवले आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाची विचारधाराच देशाचे चित्र बदलू शकते, असे ठाम मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले.

जनसेवा सहकारी बँकेच्या हडपसर येथील मुख्य कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे बँकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी या वेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले,की  पैसा आणि मनुष्य यांत माणूस महत्त्वाचा. माणूस आणि संघटन यांत संघटन महत्त्वाचे. संघटन आणि विचारधारा यात विचारधारा महत्त्वाची आहे, असे एका तत्त्ववेत्त्याने सांगून ठेवले आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेली विचारधारा या देशाचे चित्र बदलवू शकेल. स्थापत्य अभियांत्रिकीमधील मला काही समजत नाही. परंतु, मला काम करण्याची संधी मिळाली आहे. कमी वेळात जास्त काम करायचे असून, त्यामुळे देश पुढे जाणार आहे. हा विचार ठेवून काम करत असल्याने मी एवढी कामे करू शकतो. भिशी मंडळाच्या माध्यमातून जनसेवा बँकेची सुरूवात झाली. बँक म्हणून कार्यरत असतानाच सामाजिक भानही बँकेने जपले आहे, असे नानासाहेब जाधव यांनी सांगितले.