रुंदीकरण प्रस्तावास गडकरींकडून चालना
पुणे-नाशिक महामार्गावर होणारी सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी रस्तारुंदीकरण करावे, या मागणीसाठी पाठपुरावा करणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी यासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांना गळ घातली. त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिष्टाई केली. त्यानंतर केंद्र व राज्य सकारात्मक भूमिका घेईल आणि या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.
पुणे-नाशिक महामार्गाची शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर रहदारी वाढली, त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांच्या जिवाशी खेळ होतो आहे. हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम तातडीने करावे व त्यासाठी गडकरींसमवेत बैठक घेण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती. तेव्हा १५ दिवसांत गडकरींसमवेत बैठक घेऊ, असे आश्वासन बापट यांनी दिले होते. यावेळी गडकरी, बापट, लांडगे यांच्याशिवाय शिक्षणमंत्री विनोद तावडेही उपस्थित होते. ही कोंडी सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असून रुंदीकरणात ज्या शेतक ऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्याच्यासोबत सामोपचाराने भूसंपादनाचा तिढा सोडवण्यात येईल व तेथील काम जलदगतीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. तर आमदार लांडगे यांनी भोसरी ते राजगुरुनगर पर्यंतचे ३५ किलोमीटर अंतर कापण्यासाठी नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. बापट व गडकरी यांच्या मध्यस्थीमुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे.