‘संशोधनातून अनेक गोष्टी बदलता येतात, तशी मी बदलणार. वर्षभरात विजेवरील दुचाकी, बस, जैवइंधनावरील वाहने आणून पेट्रोलियम कंपन्यांचा बँडबाजाच वाजविणार असल्याचा टोला केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी लगावला.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने आयोजित केलेल्या ‘आनंदोत्सव’ या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. संस्थेतील महाविद्यालयांना राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन परिषदेकडून (नॅक) उच्च श्रेणी मिळाली. संस्थेच्या महाविद्यालयांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश  बापट, खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष विघ्नहर देव, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘संशोधनाने प्रगती साधता येते. देशाचे भविष्यच ज्ञान आणि संशोधनाच्या हाती आहे. अनेक तरुण आता संशोधनासाठी पुढाकार घेत आहेत.

इंधनाबाबत नवे नवे संशोधन पुढे येत आहे, त्या क्षेत्रात करण्यासारखे अजूनही खूप काही आहे. बायोसिएनजी, इथेनॉल सारखी इंधने यावर संशोधन होणे आवश्यक आहे. त्यामुळे मी आता सर्व बदलणार आहे. मी सरकारमध्ये कोणाचे ऐकतच नाही. वर्षभरात जैवइंधन, विद्युत ऊर्जेवरील वाहने भारतात आणून भारत पेट्रोल आणि इंडियन ऑईलचा बँडबाजा वाजवणार आहे.’

‘वैद्यकीय महाविद्यालयांसाठी चांगल्या संस्थांना जिल्हा रुग्णालयाच्या जागा देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. त्याबरोबर उद्योग क्षेत्रांनाच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यासाठी जी संस्था निवडली जाईल, त्या संस्थेला १ रुपया नाममात्र दराने तीस वर्षांसाठी भाडेतत्त्वावर या जागा देण्याची योजना शासनाच्या विचाराधीन आहे,’ असेही गडकरी यांनी सांगितले.

शिक्षणसंस्थांनी राजकारण्यांना दूर ठेवावे

‘कोणत्याही शिक्षण संस्थेला यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी राजा आणि सरकारपासून दूर राहिले पाहिजे. संस्था राजकारणापासून अलिप्त राहतील तेव्हाच चांगले काम होऊ  शकते. त्याचप्रमाणे संस्था वाढली नाही तरी चालेल मात्र, शिक्षण संस्थांनी देणगी रकमा घेणे, नोकरी लावण्यासाठी पैसे घेणे असे प्रकार करू नयेत,’ अशा कानपिचक्या गडकरी यांनी शिक्षणसंस्थांना दिल्या.