नाराज रवी लांडगे यांचा सदस्यपदाचा राजीनामा; शुक्रवारी निवडणूक

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : प्रबळ दावेदारांमुळे सुरुवातीपासून रंगतदार अवस्थेत असलेल्या पिंपरी पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्तारूढ भाजपने नितीन लांडगे यांना उमेदवारी दिली. त्यांचा उमेदवारी अर्ज भरला जात असतानाच भाजपचे अन्य इच्छुक नगरसेवक रवी लांडगे यांनी स्थायी सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे पक्षातील नाराजीनाटय़ उघड झाले.

अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी (५ मार्च) दुपारी १२ वाजता होणार आहे. त्यासाठी मंगळवारी (२ मार्च) उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके यांच्यासमवेत भाजपचे उमेदवार नितीन लांडगे यांचा अर्ज भरण्यात आला.  तर, विरोधी गटाचे संयुक्त उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांचा अर्ज शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यासमवेत दाखल करण्यात आला. स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी भाजपचे १० सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे ४, शिवसेना १ आणि अपक्ष १ असे पक्षीय संख्याबळ आहे. थेट लढतीत भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे.

उमेदवारीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची तीव्र रस्सीखेच होती. नितीन लांडगे, रवी लांडगे, शत्रुघ्न काटे, सुरेश भोईर अशी नावे चर्चेत होती. आतापर्यंत स्थायी अध्यक्षपदी सीमा सावळे, ममता गायकवाड, विलास मडेगिरी, संतोष लोंढे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळे निकष व शिफारशी ग्राह्य़ धरण्यात आल्या. या वेळी महापौरपद जगताप गटाकडे असल्याने स्थायी अध्यक्षपद महेश लांडगे गटाकडे, असे सूत्र वापरण्यात आल्याचे सांगण्यात आले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर, नितीन लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.