दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांत पुण्यातील अनेकजण सहभागी झाल्याचं समोर आलं आहे. सहभागी झालेल्या ६० जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर इतरांचा शोध घेण्याचं काम प्रशासनाकडून केलं जात आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकूण आठ हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्यातील अनेकांमध्ये करोनाची लक्षणे दिसली आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांपैकी ३० जण करोना बाधित असल्याचे चाचण्यांत स्पष्ट झाले आहे. त्यातील तीन जणांचा काही दिवसांत मृत्यू झाला. या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील अनेकजण सहभागी झाले होते. औरंगाबाद, अमरावती, पुणे यासह अनेक जिल्ह्यात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा शोध घेतला जात आहे.

आणखी वाचा- दिल्ली निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडमधील ३२ जणांचा सहभाग

पुणे शहर आणि जिल्ह्यातील काहीजण यात सहभागी झाले होते. त्यापैकी ६० जणांना जिल्हा प्रशासनानं क्वारंटाइनमध्ये ठेवलं आहे. त्यापैकी कुणालाही करोनासदृश्य लक्षणं दिसून आलेली नाही. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. इतरांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

आणखी वाचा- महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढला; मुंबईत १६, तर पुण्यात दोघांना संसर्ग

इंडोनेशियाचे आठ जण ताब्यात

‘तबलिगी मर्कझ’मध्ये सहभागी झालेले आठ इंडोनेशियन मुस्लीम धर्मप्रसारक हे उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील मशिदीत सापडले आहेत. नागिना भागातील या मशिदीतून त्यांना ताब्यात घेतले. बिजनौरचे पोलिस अधीक्षक संजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी इंडोनेशियाच्या आठ धर्मप्रसारकांना ताब्यात घेतले असून ते १३ मार्च रोजी निझामुद्दीन येथील ‘तबलिगी मर्कझ’मध्ये सहभागी झाले होते. सर्व आठ जणांना विलगीकरण केंद्रात पाठवले असून त्यांची चौकशी चालू आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर ते ओडिशाला गेले व नंतर तेथून बिजनौरला आले. ते ओडिशात नेमके कुठे गेले होते याची माहिती घेण्यात येत आहे. मशिदीच्या पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.