परिचय पत्रकावर अखिल भारतीय साहित्य महामंडळ अध्यक्षांचे छायाचित्र प्रसिद्ध केल्याने आचारसंहितेचा भंग झाला असल्याच्या तक्रारीसंदर्भात साहित्य महामंडळाच्या घटनेमध्ये कोणतीही तरतूद नसल्याने संमेलनाध्यक्षपदाचे एक उमेदवार डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यामुळे सबनीस यांच्या उमेदवारीला जीवदान मिळाले आहे. दरम्यान, अनिल कुलकर्णी यांचा तक्रारअर्ज दफ्तरीदाखल करून घेण्यात आला आहे.
सबनीस यांच्या परिचय पत्रकावर डॉ. माधवी वैद्य यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याच्या कृतीला आक्षेप घेत अनिल कुलकर्णी यांनी मंगळवारी आडकर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. हे पत्रक दोनदा पाठवून सबीनस मतदारांवर एक प्रकारचा दबाव आणत असल्याचेही कुलकर्णी यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे. ही तक्रार मिळाल्यानंतर श्रीपाल सबनीस आणि माधवी वैद्य या दोघांनाही हस्तपोच नोटीस पाठवून दोन दिवसांत खुलासा करण्यासंदर्भातील आदेश दिले होते. त्यानुसार सबनीस यांचा खुलासा मंगळवारी, तर सायंकाळी  वैद्य यांची सही असलेला खुलासा बुधवारी सकाळी ११ वाजता मिळाला. त्यानंतर साहित्य महामंडळाच्या घटनेचा आणि निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचा अभ्यास केला असता अशा घटनेनंतर काय कारवाई होते याविषयी कोठेही भाष्य नाही. हा आधार घेत अनिल कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या अर्जानुसार सबनीस यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, असा निर्णय देत असल्याचे आडकर यांनी स्पष्ट केले. हे पत्रक प्रसिद्ध करताना माधवी वैद्य यांची परवानगी घेण्याचे नजरचुकीने राहून गेले असल्याचे सबनीस यांनी मान्य केले असून हे पत्रक यापुढे मतदारांना पाठवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मतदार सुज्ञ असून कोणाच्याही नावाची पत्रके आली तरी त्याच्यावर कोणताही फरक पडत नाही, याकडेही आडकर यांनी लक्ष वेधले. कुलकर्णी यांची तक्रार दफ्तरीदाखल करून घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.

काय आहे सबनीस यांचा खुलासा
औरंगाबाद येथे २५ ऑगस्ट रोजी मी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस विचारमंचचे महेश थोरवे-पाटील यांनी मतदारांना माझे परिचय पत्रक पाठविले. त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिकांचे माझ्या साहित्याविषयीचे अभिप्राय त्यांच्या छायाचित्रांसह प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामध्ये लेखिका म्हणून माधवी वैद्य यांचाही समावेश करण्यात आला आहे. हे करताना त्यांची परवानगी घेण्याचे नजरचुकीने राहून गेले आहे. हे परिचय पत्रक मतदारांना पाठविणे या क्षणापासून बंद करीत असून विचारमंचच्या कार्यकर्त्यांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत.