शहराच्या जुन्या हद्दीतील ३४ किलोमीटर लांबीचा रिंग रोड विकसित करतानाच या रस्त्याच्या बाजूने मोनो रेलचेही नियोजन करावे, असा ठराव महापालिकेने मंजूर केला असला, तरी मोनो रेलसाठी येणारा सुमारे ५,१०० कोटी रुपये एवढा खर्च विचारात घेता या खर्चाच्या रकमेचे नियोजन झाल्यानंतरच मोनो रेलसाठी सल्लागार नियुक्त करण्याचा विचार करता येईल, असा अभिप्राय महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ात रिंग रोडचे आरक्षण असून या रस्त्याचे विकसन करतानाच मोनो रेलचाही प्रकल्प राबवावा व त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करावी, असा ठराव स्थायी समितीने मंजूर केला होता. मात्र या ठरावावर महापालिका प्रशासनाकडून प्रतिकूल अभिप्राय आला असून मूळ रिंग रोडचे पूर्ण विकसन झाल्याशिवाय तसेच मोनो रेलसाठीच्या आवश्यक खर्चाची तरतूद झाल्याशिवाय मोनो रेलसाठी सल्लागार नेमता येणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे.
मुळात रिंग रोडसाठीचे पूर्ण क्षेत्र अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेले नाही. त्यासाठीची भूसंपादन कार्यवाही सध्या सुरू आहे. या रस्त्यावर मोनो रेल प्रकल्प राबवण्यासाठी ढोबळमानाने प्रतिकिलोमीटर १५० कोटी रुपये याप्रमाणे ५,१०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी केंद्राकडून २० टक्के एवढा निधी उपलब्ध होऊ शकेल आणि उर्वरित ८० टक्के रक्कम अन्य स्रोतांद्वारे उभी करावी लागेल. ही रक्कम अन्य स्रोतांमधून उपलब्ध होण्याबाबत निश्चिती झाल्याशिवाय सल्लागाराची नेमणूक केल्यास तयार झालेली माहिती, नकाशे, तंत्रज्ञान यामध्ये प्रत्यक्ष कार्यवाहीच्या वेळी काही बदल होण्याची शक्यता आहे. तसेच जागा ताब्यात नसताना प्रकल्पासाठी निविदा काढल्यास ठेकेदारांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. मोनो रेलसाठी सल्लागाराची नियुक्ती करायची झाल्यास प्रकल्पाच्या दोन टक्के म्हणजे १०० ते १२० कोटी इतकी रक्कम सल्लागाराला द्यावी लागेल. या सर्व बाबींचा विचार करता रिंग रोडचे पूर्ण विकसन तसेच झाल्याशिवाय मोनो रेलच्या आवश्यक खर्चाच्या रकमेचे नियोजन झाल्यानंतर मोनो रेल प्रकल्पासाठी सल्लागार नेमणे योग्य होईल, असे प्रशासनाच्या अभिप्रायात स्पष्ट करण्यात आले आहे.

रिंग रोड आणि मोनो रेल..

जुन्या हद्दीत ३४ किलोमीटर लांबीचा रिंग रोड
याच रस्त्यावर मोनो रेलचे नियोजन
मोनो रेलसाठी ५,१०० कोटींचा खर्च अपेक्षित