चाकण विमानतळासाठी पूर्वी निवडण्यात आलेली जागा अडचणीची होती. मात्र, आता जागेवरून कोणतेही वादविवाद अथवा अडचणी नाहीत. भारत फोर्ज कंपनीची एसईझेडची व काही खासगी जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. याबाबतचा अहवाल यायचा आहे. तांत्रिक मान्यतेनंतर विमान प्राधिकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाची सभा मंगळवारी पार पडली. सभेतील निर्णयांची माहिती देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, नगररचना उपसंचालक अविनाश पाटील, प्रतिभा भदाणे आदी उपस्थित होते. वैयक्तिक तसेच बांधकाम व्यावसायिकांना प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या भूखंडांविषयी बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ज्यांच्यासाठी घरे बांधली, त्यांना घराची मालकी मिळाली नाही, याविषयी नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्यांना बांधकाम व्यावसायिक दाद देत नाहीत. ते हस्तांतरण येत्या तीन महिन्यात करावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे, असे ३७५ विकासक असतील. रिक्त भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्यासाठी नोटिसा बजावण्यात येणार आहे. जागा विकत घेऊन ठेवली, मात्र, ती विकसित केली, किंमत वाढवून ती विकली, असे होता कामा नये. खोटी कागदपत्रे सादर करून भूखंड मिळवले जातात, त्याचे मूळ शोधून ४० वर्षांपासून सुरू असलेली प्रक्रिया सुटसुटीत करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार, पूर्वी इतक्या कागदपत्रांची आवश्यकता नसून पूर्वीच्या तुलनेत ११ कागद कमी लागतील.
काळेवाडी उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून ते नोव्हेंबपर्यंत पूर्ण होईल. चिंचवड जुना जकात नाका ते रावेतचे भूमीसंपादनाचे काम प्रगतिपथावर आहे. कुदळवाडीतील उड्डाणपुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सांगवी-रावेत रस्त्यावर पहिल्याटप्प्यात ७७ कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात ३० कोटींच्या उड्डाण पुलाचे काम होणार आहे. वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पाच्या बाबतीत शासनाचा सकारात्मक प्रतिसाद असून लवकरच निर्णय होईल. १२ क्रीडांगणाचे काम करण्यात येणार आहे. हॉकर्स झोनच्या कामांना मान्यता मिळाली असून त्याचा आराखडा तयार करतो आहोत. वाकड पोलीस ठाण्याचे काम प्राधिकरण करणार असून ठाणे तयार झाल्यानंतर त्याचा ताबा दिला जाणार आहे. चिंचवड रावेत रस्त्यावर अडीच कोटी खर्चून दिवे बसवण्यात येणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले.