रेल्वेचा ‘नो बिल – नो पेमेंट’ उपक्रम आता पुणे विभागातही

पुणे : रेल्वे आणि रेल्वे स्थानकांवर काही विक्रेत्यांकडून खानपान किंवा इतर वस्तूंच्या खरेदीसाठी जादा दराची आकारणी होत असल्याच्या तक्रारी आल्याने ‘पावती नाही, तर खानपान फुकट’ म्हणजेच ‘नो बिल – नो पेमेंट’ हा उपक्रम रेल्वेने सुरू केला आहे. पुणे विभागातील रेल्वे स्थानकांवरही या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, ‘नो बिल- फूड फ्री’ असे फलक लावण्याची सक्ती विक्रेत्यांना करण्यात आली आहे. कोणत्याही वस्तूच्या खरेदीनंतर पावती न दिल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे.

लांब पल्ल्याच्या जवळपास सर्वच गाडय़ांमध्ये खानपान सुविधा आहे. त्याचप्रमाणे अधिकृत विक्रेत्यांकडून चहा, पाणी आदींसह पाकीटबंद वस्तूंची रेल्वे गाडय़ांमध्ये विक्री केली जाते. खानपान सुविधा असलेल्या गाडीमध्ये खानपानाचे रेल्वेने ठरविलेले दरपत्रक लावण्याची सक्ती आहे. या दरपत्रकानुसारच खानपान व्यवस्था प्रवाशांना देणे बंधनकारक असताना अनेक गाडय़ांमध्ये खानपान ठेकेदाराकडून दरपत्रक लावले जात नाही. त्याचप्रमाणे प्रवाशांनी मागणी करूनही दरपत्रक सादर केले जात नाही. रेल्वेने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अधिक पैशांची वसुली अनेक गाडय़ांमध्ये करण्यात येत आहे. अशीच स्थिती रेल्वे फलाटावर असलेल्या खानपानाच्या व्यवस्था किंवा वस्तू विक्रेत्यांबाबतही आहे. चहा, बाटलीबंद पाण्यासह विविध वस्तू किंवा खाद्यपदार्थाची विक्री चढय़ा दराने केली जात असल्याच्या अनेक तक्रारी रेल्वेकडे यापूर्वी आल्या आहेत. त्याची दखल रेल्वेने ठोस पावले उचलली आहेत. पावती नाही, तर पैसे नाही, असा उपक्रम रेल्वेनेच जाहीर करून प्रवाशांना दिलासा दिला आहे.

रेल्वेच्या पुणे विभागामध्ये विभागीय व्यवस्थापकांच्या आदेशानुसार ‘नो बिल- नो पेमेंट’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वस्तू किंवा खानपानाच्या खरेदीवर कोणतीही अतिरिक्त आकारणी होणार नाही. त्याचप्रमाणे बिल न दिल्यास वस्तू फुकट मिळेल, अशा स्वरूपाचे फलक विक्रेत्यांनी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय गाडय़ा आणि स्थानकांवर वाणिज्यिक कर्मचारी, खानपान निरीक्षक आदींचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून वेळोवेळी अचानकपणे तपासणी करण्यात येणार असून, दोषी आढळणारे विक्रेते किंवा खानपान ठेकेदारांवर कारवाई केली जाणार आहे. त्यात परवाना रद्द करण्याच्या कारवाईचाही समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे याबाबत स्थानकावर ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून सूचनाही देण्यात येत असल्याचे रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले.

विक्रेत्यांनाही काही अडचणी

रेल्वे स्थानकावर विक्रेत्यांनाही काही अडचणी निर्माण होत असल्याचे वास्तव आहे. स्थानकावर थांबा घेऊन पुढे जाणाऱ्या गाडय़ांना दोन मिनिटांचा थांबा असतो. त्या वेळेत प्रवाशाने १०० रुपये देऊन एक समोसा किंवा पाण्याची बाटली घेतल्यास त्याला पावती करून देणे आणि सुटे पैसे देण्यात वेळ पुरेसा ठरत नाही. त्याचप्रमाणे कार्ड पेमेंट असल्यास ते शक्य होत नाही. त्यामुळे या कामांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ ठेवावे लागते आणि यंत्रांसाठीही अतिरिक्त खर्च येत असल्याचा दावा विक्रेते करीत आहेत.

‘कार्ड पेमेंट’साठी गाडय़ांमध्येही यंत्र

स्थानकावरील विक्रेत्यांसह यापुढे गाडय़ांमध्येही कार्ड पेमेंटसाठी पीओएस यंत्रण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्ड पेमेंट आणि बिलांच्या माध्यमातून रोकडरहित व्यवहारासह ग्राहकांकडून जादा पैशांची वसुली होऊ नये, हा यामागील उद्देश असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. बंगलुरु-दिल्ली दरम्यान चालणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. पुढील टप्प्यात २६ रेल्वे गाडय़ांमध्ये १०० यंत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत.