डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात शस्त्र पुरविल्याच्या संशयावरून मनिष नागोरी टोळीकडे झालेल्या चौकशीत अद्याप तरी पोलिसांना कोणतेच धागेदोरे मिळालेले नाहीत. याबाबत अधिकृतपणे मात्र पोलिसांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दरम्यान या टोळीतील चौघांना िहजवडी येथील खून प्रकरणामध्ये गुरुवारी न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.
मनिष रामविलास नागोरी (वय २४, रा. कोल्हापूर), राहुल माळी (वय २१), विकास खंडेलवाल (वय २२)यांना िहजवडी येथील खुनाच्या गुन्ह्य़ामध्ये अटक करण्यात आली होती. ठाणे येथे बेकायदा शस्त्र विक्रीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर या टोळीला पुणे विद्यापीठातील रखवालदाराच्या खुनाच्या प्रकरणात वर्ग करण्यात आले. त्याचप्रमाणे िहजवडी येथे एका तीस वर्षीय व्यक्तीच्या खुनासाठीही त्यांना अटक करण्यात आली. या खुनाच्या दिवशी नागोरी िहजवडी भागात असल्याचे त्याच्या मोबाईल क्रमांकावरून स्पष्ट झाले आहे. या खुनाच्या तपासासाठी आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये या टोळीने शस्त्र पुरविल्याचा संशय आहे. त्याबाबतही पोलिसांकडून या टोळीच्या सदस्यांकडे तपास करण्यात आला. मात्र, त्यातून अद्यापही काही ठोस माहिती हाती लागलेली नाही.