संरक्षणमंत्र्यांनी अहवाल मागवला
केवळ चर्चा, बैठका आणि निवेदनांच्या पुढे न गेल्याने बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्न ‘जैसे थे’ राहिला आहे. भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी यासंदर्भात संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांची पुन्हा भेट घेतली असता लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बोपखेल येथील वर्षांनुवर्षे सुरू असलेला रहदारीचा रस्ता लष्कराने बंद केला. नागरिकांची गैरसोय होऊ लागली, तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार र्पीकर यांनी तात्पुरत्या स्वरूपाचा पूल उपलब्ध करून दिला.
पुढे, पावसाळा सुरू झाल्यानंतर तो पूल धोकादायक ठरू शकतो, असे सांगत तो पूलही काढण्यात आला. तेव्हापासून बोपखेलेचे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी १५ किलोमीटरचा वळसा घालावा लागतो आहे. कुंभमेळ्याच्या धर्तीवर तात्पुरता पूल उभारून देऊ, असे आश्वासन र्पीकरांनी यापूर्वी दिले होते. प्रत्यक्षात, त्याची पूर्तता झाली नाही.
नगरसेवक, आमदार, खासदार यासंदर्भात र्पीकरांना भेटतात. मात्र, ठोस तोडगा निघू शकलेला नाही, असे चित्र पुढे आले आहे. या पाश्र्वभूमीवर, भाजप शहराध्यक्षांनी संरक्षणमंत्र्यांची दिल्लीत भेट घेतली. तेव्हा त्यांना पुन्हा आश्वासनच देण्यात आले.
लष्कराच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून बोपखेलबाबतचा अहवाल मागविला आहे. तो मिळाल्यानंतर, ग्रामस्थांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 12:20 am