मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

बांधकाम कामगारांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवली जात आहे. त्याअंतर्गत शहरात घर घेण्यासाठी तसेच ग्रामीण भागात कच्चे घर पक्के करण्यासाठी दोन लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत एकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

राज्य कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्य मंत्रिमंडळातील संभाजी पाटील निलंगेकर, गिरीश बापट, दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय पाटील, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) अध्यक्ष गौतम चॅटर्जी, कामगार आयुक्त राजीव जाधव, तसेच ओमप्रकाश यादव, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, बांधकाम कामगार घरे बांधतात, त्यांना राहण्यासाठी निवारा नाही. त्यांना पालाच्या, पत्र्याच्या घरात राहावे लागते ही शोकांतिका आहे. त्यामुळेच अटल बांधकाम कामगार आवास योजना आणली आहे.

दहा लाख बांधकाम कामगारांची नोंदणी

आम्ही सत्तेत आल्यापासून आतापर्यंत दहा लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांच्यासाठी तब्बल ४५० कोटी रुपये खर्च केले आहेत. हा बांधकाम कामगारांचा पैसा असून आम्ही त्याचे विश्वस्त आहोत. त्यातील एक-एक पैसा कामगारांसाठीच खर्च केला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.