रुग्णवाहिकेचा वापर करण्याची वेळ तशी कुणावर येऊ नये, पण एखादा प्रसंग सांगून येत नाहीत. रुग्णाला तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यासाठी किंवा मृतदेह घरी किंवा स्माशानभूमीत नेण्यासाठी या वाहनाची नितांत गरज असते.. पण, याही प्रसंगात रुग्णवाहिकेसाठी मनमानी भाडेआकारणी केली जाते. अशा प्रकारच्या भाडेआकारणीचे प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर परिवहन प्राधिकरणाने रुग्णवाहिकांसाठी भाडेपत्रक ठरवून दिले. पण, हे दरपत्रक सध्या केवळ कागदावरच राहिले असून, त्याचे पालन कुठेही होत नसल्याचे चित्र आहे. कारवाईचे अधिकार असलेली यंत्रणाही ढिम्म असल्याने रुग्णवाहिकांची मनमानी भाडेआकारणी सुरूच आहे.
अवघ्या काही अंतरावर रुग्ण किंवा मृतदेह नेल्यास रुग्णवाहिका चालकाकडून अवाच्या सवा भाडे सांगितले गेल्यास ‘त्या’ प्रसंगात कुणी सहसा घासाघीस करीत नाही. याचाच फायदा घेत खासगी रुग्णवाहिकांकडून मनमानी पद्धतीने भाडय़ाची आकारणी केली जाते. अशा प्रकारच्या भाडेआकारणीबाबत कुणी तक्रार देण्याच्या भानगडीतही पडत नाही. मात्र, शहरात हे प्रकार वाढल्याने सजग नागरी मंचच्या वतीने याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी दाखल करण्यात आल्या. या तक्रारींचा विचार करून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये रुग्णावाहिकांसाठीही भाडेपत्रकाची निश्चिती करण्याचे नियोजन करण्यात आले. २१ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार भाडेनिश्चिती करण्यात आली. हे भाडे नेमके पाहायचे कुठे, याबाबत तक्रारी केल्यानंतर हे भाडेपत्रक काही दिवसांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले.
प्राधिकरणाने मंजूर केलेल्या रुग्णवाहिकांचे भाडेपत्रक सर्व रुग्णालयांमध्ये त्याचप्रमाणे रुग्णवाहिकांमध्येही लावणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांना रुग्णवाहिकांचे नेमके भाडे समजू शकेल. याबाबत महापालिकेने मात्र काहीशी दक्षता घेतली आहे. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये रुग्णवाहिकेच्या भाडेपत्रकाचे फलक लावण्यात आले आहेत. रुग्णालय किंवा रुग्णवाहिका चालकांकडून मात्र त्याबाबत अद्याप काहीही करण्यात आलेले नाही. मुळात रुग्णवाहिकेचे भाडे ठरवून देणारी यंत्रणा व कारवाईचे अधिकार असणारी यंत्रणा याबाबत ठोस काहीच करीत नसल्याचे दिसते आहे. भाडेपत्रकाबाबत कोणतीही सक्ती केली जात नाही. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांचे फावते असून, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
रिक्षांप्रमाणे रुग्णवाहिकेसाठीही भाडेपत्रकाची सक्ती केली पाहिजे. प्रत्येक रुग्णवाहिकेमध्ये दर्शनी भागात हे भाडेपत्रक लावले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व रुग्णालयांमध्येही हे भाडेपत्रक लावण्याची सक्ती केली पाहिजे. भाडेपत्रक केवळ तयार केले आहे, पण त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरटीओ किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून ठोस प्रयत्न होत नसल्याने दु:खद प्रसंगीही अनेकांची लूट होते आहे.
– विवेक वेलणकर
अध्यक्ष, सजग नागरी मंच
.

असे आहे रुग्णवाहिकांचे भाडे :
रुग्णवाहिकेचा प्रकार            २५ किलोमीटर किंवा दोन तासांसाठी भाडे        प्रती कि.मी. भाडे
मारुती व्हॅन                                 २५० रुपये                    ९ रुपये
टाटा सुमो, मॅटॅडोर सदृश वाहन        ३०० रुपये                    १० रुपये
टाटा ४०७, स्वराज मझदा              ५०० रुपये                    १२ रुपये
आयसीयू, वातानुकूलित                 ७०० रुपये                    २० रुपये