परतीच्या पावसाने ओढ दिल्याने व्यवहारांवर परिणाम

दिवाळीचे वेध लागताच घाऊक भुसार बाजारात खरेदीदारांची गर्दी सुरू होते. फराळासाठी लागणाऱ्या जिन्नसांच्या खरेदीसाठी परगावातील तसेच पुणे शहरातील किरकोळ व्यापारी आणि सामान्य खरेदीदार एकच गर्दी करतात. मात्र, यंदा भुसार बाजारावर मंदीचे सावट असून, परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने बाजारातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची अद्याप बाजारात गर्दी झालेली नाही.

दिवाळीत कपडे बाजार आणि भुसार बाजारातील व्यवहार तेजीत असतात. नोटाबंदीनंतर तसेच वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर बाजारातील व्यवहारांवर परिणाम झाला. राज्यात परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे भुसार बाजारातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे, असे निरीक्षण दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी नोंदविले.

दिवाळीत मार्केट यार्डातील घाऊक बाजारात खरेदीसाठी अद्याप विशेष गर्दी झालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून शहरी भागातील ग्राहकांकडून तयार फराळाला मागणी वाढत आहे. त्यामुळे बाजारात येणारा ग्राहक कमी झाला आहे. भुसार बाजारात खरेदीसाठी परगावाहून खरेदीदार येतात. परगावात पुण्यातील भुसार बाजारातील माल विक्रीसाठी पाठवला जातो. यंदा दुष्काळाचे सावट असल्याने घाऊक बाजारात अद्याप विशेष उलाढाल झाली नसल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले.

यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने गूळ आणि भुसार बाजारातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. बाजारात बेसन, आटा, रवा आणि मैद्याची आवक कमी झाली आहे. मागणी नसल्याने बेसन पीठाच्या दरात  घट झाली आहे. आटा, रवा, मैद्याचे दर स्थिर असल्याची माहिती मैद्याचे व्यापारी आशिष शहा यांनी दिली. भुसार बाजारातील व्यापारी कांतिलाल गुंदेचा म्हणाले, गेल्या आठ दिवसांपासून आवक वाढल्याने पोहय़ांच्या दरात क्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांनी घट झाली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत पोहय़ांचे दर अधिक आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यंदा पोहय़ांना मागणी कमी आहे.

उडीद डाळ, मूग डाळ, मटकी ,चणा डाळ, भाजकी डाळीचे दर वाढले आहेत. ग्राहकांची अपेक्षेएवढे गर्दी नसल्याचे डाळीचे व्यापारी ओम राठी यांनी नमूद केले. यंदा साखरेचे उत्पादन चांगले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत साखरेचे दर क्विंटलमागे ३०० रुपयांनी उतरले आहेत. बाजारात प्रतिक्विंटल साखरेला ३२०० ते ३३०० रुपये दर मिळाला असल्याचे साखरेचे व्यापारी राजेश फुलपगर यांनी सांगितले.

शेंगदाणा तेल वगळता अन्य तेलांचे दर तेजीत

शेंगदाणा तेल वगळता अन्य सर्व तेलांचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. शेंगदाण्याच्या दरात घट झाल्यामुळे शेंगदाणा तेल व रिफाइंडचे दर १०० ते २०० रुपयांनी उतरले आहेत.