राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा आयपीएलचा उद्योग सुरू आहे, तर अजित पवार यांचा ‘डीपी’एल (डेव्हलपमेंट प्रीमियर लिग) हा उद्योग सुरू आहे. त्यामुळेच मूठभर बांधकाम व्यावसायिकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या हिताचा ठरेल असाच विकास आराखडा तयार करण्यात आला असून तो डीपी (डेव्हलपमेंट प्लॅन) नसून एपी (अजित पवार प्लॅन) असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता विनोद तावडे यांनी गुरुवारी केली.
शहर भारतीय जनता पक्षातर्फे विकास आराखडा या विषयावर आयोजित महाचर्चा कार्यक्रमात तावडे बोलत होते. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, गटनेता अशोक येनपुरे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
विकास आराखडा तयार करताना पवार कुटुंबीय, सत्ताधारी आणि बांधकाम व्यावसायिक यांचेच हित पाहण्यात आले आहे आणि नागरिकांचे हित सोयीस्कर रीत्या डावलण्यात आले आहे. प्रस्तावित डीपी (डेव्हलपमेंट प्लॅन) हा एपी (अजित पवार प्लॅन) आहे. आराखडय़ात अनेक गंभीर चुका आहेत. तो निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तयार झाल्याचेही आरोप होत आहेत.  एकूणच आराखडय़ाची वाट लागली आहे आणि त्यासाठी रस्त्यावर उतरूनच लढाई लढावी लागणार आहे, असे तावडे यांनी या वेळी सांगितले. आराखडय़ाची अंमलबजावणी करण्यासाठी जे तीन लाख कोटी रुपये लागणार आहेत त्याची उभारणी कशी केली जाणार आहे, अशीही विचारणा तावडे यांनी केली.
‘विकास नाही, आराखडही नाही’
शहराचा विकास आणि आराखडा यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे आम्ही आराखडय़ाला हरकती-सूचना देणार आहोत. मात्र, तरीही दाद लागू दिली गेली नाही, तर मात्र आराखडा मंजूर होऊ देणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आणि न्यायालयीन लढाई लढण्याचीही तयारी आहे, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी बोलताना दिला. महाचर्चेचा समारोप फडवणीस यांच्या भाषणाने झाला. केवळ वैयक्तिक फायद्यासाठीच तयार करण्यात आलेला हा आराखडा असल्याने तो आम्ही मंजूर होऊ देणार नाही. त्यासाठी पुणेकरांनीही जास्तीत जास्त हरकती-सूचना नोंदवाव्यात, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. चर्चेचे सूत्रसंचालन अशोक येनपुरे यांनी केले. अनिता बेनिंजर, विश्वंभर चौधरी, भास्करराव मिसर, शरद महाजन यांनीही आराडय़ातील अनेक त्रुटी या वेळी निदर्शनास आणून दिल्या.
एवढा भयानक आराखडा पाहिला नव्हता – फडणवीस
पुण्याचा विकास आराखडा तयार करताना संबंधित विभागाने त्यात अनेक गंभीर चुका केल्या आहेत. मी आतापर्यंत अनेक शहरांच्या विकास आराखडय़ाचा अभ्यास केला; पण एवढा भयानक आणि भकास आराखडा मी कधी पाहिला नव्हता, असे देवेंद्र फडणवीस यांनी महाचर्चेत सांगितले. विसंगत उपसूचना, मेट्रोचा वाढीव एफएसआय, अनावश्यक निवासीकरण अशा अनेक मुद्यांवर फडणवीस यांनी या वेळी टीका केली.