लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा धसका मनोरंजनसृष्टीने घेतला आहे. मे महिना या सुगीच्या हंगामातील शुक्रवार असूनही एक मराठी, हिंदूी, इंग्रजी चित्रपटाचा अपवाद वगळता कोणत्याही बडय़ा बॅनरचा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. तर बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथील रात्रीचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी होत असून, देशामध्ये कोणत्या पक्षाचे वारे आहे याचा कल दुपारनंतर ध्यानात येईल. अनेक जण उत्सुकतेने दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्या आणि विश्लेषण कार्यक्रम पाहण्यामध्येच रस घेतात. हे ध्यानात घेऊन मे महिन्यातील शुक्रवार असूनही चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस कोणत्याही बडय़ा निर्मात्याने दाखवलेले नाही. ‘झेंटलमन’ हा मराठी, ‘एम-३’ हा हिंदूी आणि ‘गॉडजिला-२’ असे तीन नवीन चित्रपट पडद्यावर झळकणार आहेत. मात्र, पहिल्या दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद लाभेल याविषयी शंका आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री साडेनऊ वाजता होणारा ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा आणि यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे रात्री होणारा भावगीतांचा कार्यक्रम निवडणूक निकालामुळे रद्द करण्यात आला आहे. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये दुपारी साडेबारा वाजता नाटय़प्रयोग होत असून, सायंकाळी साडेपाच वाजता संत दर्शन मंडळाचा भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे, तर यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे सकाळी बालनाटय़ांचे प्रयोग होणार असून सायंकाळचा स्लॉट कोणालाही देण्यात आलेला नाही, असे महापालिका रंगमंदिराचे मुख्य व्यवस्थापक भारत कुमावत यांनी सांगितले.