करोना संसर्गाचा परिणाम; संसर्ग कमी झाल्यास विद्यापीठांच्या पुढील सत्रांतील प्रवेश प्रक्रिया शक्य

पुणे : राज्यातून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र करोना विषाणू संसर्गामुळे विमानसेवा, व्हिसा मिळण्याची प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांतील शिक्षण सध्या तरी दूरच असून, परिस्थिती पूर्वपदावर येण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागेल.

राज्यातील विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी., पोस्ट डॉक्टरल संशोधन अशा विविध अभ्यासक्रमांसाठी अमेरिका, युनायटेड किंग्डम, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड आदी देशांतील विद्यापीठांना प्राधान्य देतात. मात्र, अनेक देशांमध्ये करोना विषाणू संसर्गाचा मोठा प्रभाव आहे. परिणामी परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी जाणे सध्या तरी शक्य नाही. पुढील काही महिन्यांत संसर्ग कमी झाल्यास विद्यापीठांच्या पुढील सत्रांतील प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सहभागी होता येऊ शकेल.

विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिकायला जाता येणार नाही. टाळेबंदीमुळे दूतावासातील कामकाज बंद आहे. ते कधी सुरू होणार याची काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना या सत्रासाठीचा प्रवेश मिळू शकणार नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना जानेवारीत जाणे शक्य होऊ शकेल. तेही करोना संसर्ग कमी होण्यावर अवलंबून आहे. अमेरिकेतील विद्यापीठे पुढील सत्रात प्रवेश देण्याबाबत सांगत आहेत. भारतभरातून सुमारे तीस ते पस्तीस हजार विद्यार्थी अमेरिकेत शिकतात, असे परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशांचे मार्गदर्शक दिलीप ओक यांनी सांगितले.

जर्मनीतील विद्यापीठांविषयी जर्मन भाषेचे मार्गदर्शक धनेश जोशी म्हणाले, की जर्मनीमधील करोना संसर्ग आटोक्यात आल्याने तेथील काही विद्यापीठांनी आवश्यक काळजी घेऊन प्रत्यक्ष वर्ग आणि ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. तसेच एप्रिलमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम ऑनलाइन सुरू केले आहेत.

जर्मनीतील विद्यापीठांमध्ये ऑक्टोबर आणि एप्रिल असे दोन वेळा प्रवेश होतात. त्यामुळे सध्या विद्यापीठांमध्ये प्रवेश सुरू आहेत. मात्र, भारतातून जर्मनीत जाण्यासाठीची व्हिसा प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत सुरू होऊ शकणार नाही.

सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासारखी स्थिती नाही. परदेशातील काही विद्यापीठांकडून सप्टेंबरमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू के ले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे, ते ऑनलाइन वर्गामध्ये सहभागी होऊ शकतात. पण ज्यांना परदेशातच जाऊन शिकायचे आहे, त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठांकडून जानेवारीत प्रवेश दिला जाईल, असे परदेशांतील विद्यापीठांच्या प्रवेशांचे मार्गदर्शक संदीप द्रविड म्हणाले.

ऑनलाइन अभ्यासक्रमांना विशेष कल नाही

परदेशांतील विद्यापीठांकडून ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी मोठे शुल्कही आकारण्यात येते. मात्र अनेक विद्यार्थ्यांना ते शुल्क परवडत नसल्याने विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रमांकडे विशेष कल नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.