News Flash

आंब्यावर या वेळीही ‘कार्पेट’ची छाया राहणार? पिकवायला ‘इथिलिन चेंबर’ नाहीत

यंदाही बाजारात येणारा आंबा नैसर्गिकरीत्या पिकवलेला आहे की ‘कॅल्शियम कार्बाईड’ची पुडी (कार्पेट) वापरून पिकवलेला आहे, ही ग्राहकांची चिंता कायम राहणार आहे.

| February 17, 2015 03:30 am

लहानथोरांचा लाडका हापूस आंबा पुणे बाजारात येऊ लागला आहे. पण यंदाही बाजारात येणारा आंबा नैसर्गिकरीत्या पिकवलेला आहे की ‘कॅल्शियम कार्बाईड’ची पुडी (कार्पेट) वापरून पिकवलेला आहे, ही ग्राहकांची चिंता कायम राहणार आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डात आंबा पिकवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची इथिलिन गॅस चेंबर अजूनही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत काही आंबा व्यापाऱ्यांनी आंबा ठेवून देऊन तो नैसर्गिकरीत्या पिकवण्याचा मार्ग अवलंबला आहे. मात्र जेव्हा बाजारात खूप मोठय़ा प्रमाणावर आंब्याची उलाढाल सुरू होईल तेव्हा आंबा ठेवून देण्याचा पर्याय कितपत कामी येईल हा प्रश्न आहे.
आंबाव्यापारी सिद्धार्थ खैरे म्हणाले, ‘‘गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये केवळ २ ते ३ इथिलिन गॅस चेंबर आहेत. ती देखील खासगी मालकीची आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने इथिलिन चेंबर्सची सोय केलेली नाही. अजून आंब्याची आवक कमी आहे, त्यामुळे आंबा आठवडाभर ठेवून देणे शक्य होते. असे केल्यास आंबा तापमानामुळे नैसर्गिकरीत्या पिकतो. पण जेव्हा आवक वाढते आणि दिवसाला १०-१० हजार पेटय़ा बाजारात येतात तेव्हा आंबा फारसा ठेवता येत नाही, कारण दुसऱ्या दिवशीही आंब्याची आवक होणार असते. इथिलिन गॅस चेंबर्सची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मध्यंतरी मार्केट यार्डजवळ ‘मॅफ्को’चे एक चेंबर सुरू होते, काही आंबा व्यापारी ते वापरतही होते. त्या ठिकाणी फूलबाजार नियोजित असल्यामुळे ही चेंबर पाडलेली आहेत.’’
‘सध्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना तीन दिवस आंब्यांची अढी लावून नंतरच माल पाठवण्यास सांगितले आहे,’ असे आंबाव्यापारी विनय काची यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘पुण्याच्या बाजारात इथिलिन गॅस चेंबर हवीत ही मागणी गेली दोन वर्षे आहेच, त्याबाबत आश्वासनेही मिळाली पण ती पूर्ण झाली नाही. सध्या खासगी मालकीची मोजकीच इथिलिन गॅस चेंबर्स असून सर्व आंबे विक्रेत्यांना पुरेशी नाहीत. इथिलिन चेंबर बांधून घेण्यासाठी जागेचा प्रश्न मोठा आहे.’’
‘काही आंबा उत्पादकांनी ‘कार्पेट’ला पर्याय म्हणून आंबा तोडल्यावर तो एका विशिष्ट द्रावणात बुडवून काढण्याचा उपाय शोधला आहे. असा आंबा हवेशीर जागी ठेवल्यावर एका दिवसात त्याला चांगला रंग येऊ लागतो,’ अशी माहिती आणखी एका आंबा व्यापाऱ्याने दिली.  

हापूसची पेटी: ३ ते ६ हजार रुपयांना!
जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात पुण्याच्या बाजारात आंबा येऊ लागला आहे. सध्या रत्नागिरी आणि देवगडहून हापूस येत असून गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये दर एक दिवसाआड २० ते २५ पेटय़ांची आवक होत आहे. हापूसचा भाव सध्या तीन ते सहा हजार रुपये प्रतिपेटी (प्रत्येक पेटीत चार ते सात डझन आंबे) आहे. सध्या आंब्याची आवक कमी असली तरी १० ते १५ मार्चनंतर ती वाढेल, असेही काही आंबा विक्रेत्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी पुण्यातून ८ हजार किलो आंबा जप्त!
गेल्या वर्षी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे जिल्ह्य़ातील आंबा विक्रेत्यांकडून तब्बल ८ हजार किलोंचा आंबा ‘कार्पेट’ चा वापर केल्याबद्दल जप्त केला होता. या आंब्याची किंमत साडेसात लाख रुपये होती. तसेच ८ आंबा विक्रेत्यांवर एफडीएने खटले भरले आहेत. कॅल्शियम कार्बाइडचा वापर आरोग्यास हानीकारक असल्यामुळे ‘अन्न सुरक्षा व मानदे कायद्या’नुसार आंबा किंवा इतर फळेही कॅल्शियम कार्बाइडने कृत्रिमरीत्या पिकवण्यास बंदी आहे. फळाच्या नमुन्याचे विश्लेषण केल्यावर त्यात कॅल्शियम कार्बाइड आढळले, तर संबंधितावर न्यायालयीन कारवाई केली जाते. तर विक्रेत्याकडे कॅल्शियम कार्बाइडचा साठा आढळल्यास दंडात्मक कारवाई होते. एफडीएने नुकतीच मार्केट यार्ड येथील आंबा विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना कॅल्शियम कार्बाइडचा वापर न करण्याबद्दल सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 3:30 am

Web Title: no ethilin chambers to ripen mangoes
Next Stories
1 साडेनऊशे कोटींची वीजविषयक कामे खोदाई शुल्क वाढल्याने ‘महावितरण’ची कामे रखडली
2 अकरावी प्रवेशाची दुकानदारी वाढणार?
3 मराठीच्या अभिजाततेवर जागतिक मोहोर
Just Now!
X