कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरयाणा येथील शेतकऱ्यांचे दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू असून आज ‘भारत बंद’ ची हाक त्यांनी दिली आहे. त्याला अवघ्या देशातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात या बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत काही प्रमाणात दुकाने बंद आहेत. तर इतर ठिकाणी दुकाने सुरू असल्याचं चित्र आहे. ऐकून पाहता शेतकऱ्यांच्या भारत बंद ला शहरातून संमिश्र प्रतिसाद आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्वपक्षीय आणि कामगार संघटनांनी एकदिवसीय आंदोलन केलं.
पंजाब आणि हरयाणा येथील शेतकरी आंदोलन करत असून या पार्श्वभूमीवर देशभर भाजपा सरकार विरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत. सोशल मीडियावर मोदी सरकारला धारेवर धरले जात असून शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवा अश्या पोस्ट फेसबुक, व्हाट्सऍपद्वारे व्हायरल होत आहेत. त्यामुळे अवघ्या भारत देशात शेतकऱ्याला पाठिंबा असल्याचं चित्र आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात याबाबत संमिश्र प्रतिसाद आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला असून सर्वपक्षीय आणि काही संघटना आंदोलन करत आहेत.
खरं तर, दर मंगळवारी पिंपरीतील मुख्य बाजारपेठ बंद असते मात्र आज मोठ्या प्रमाणावर दुकानदारांनी दुकाने उघडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भारत बंद ला शहरातून संमिश्र प्रतिसाद आहे. शहरातील वाहतूक देखील सुरळीत असून शहरातील मुख्य चौकातील वाहतूक वळवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरीत १२० पोलीस कर्मचारी, दहा अधिकारी, एसआरपी तुकडी, आरसीपी ची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सर्व पक्षीय नेत्यांना पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी बैठक घेऊन आजच आंदोलन शांततेत पार पडावं असं आवाहन केलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 3:47 pm