सध्या सुट्टय़ा लागल्या असल्यामुळे मुले मैदानांच्या शोधात आहेत. मात्र, मुळातच मैदाने कमी असताना आहेत ती मैदाने विविध कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येत असल्यामुळे मुलांच्या हक्काच्या जागांवर गदा आली आहे. विद्यापीठातील मैदानेही याला अपवाद ठरली नसून वर्षभरही शनिवारी आणि रविवारी विद्यापीठाचे मैदान बाहेरील संस्थांना वापरण्यास देण्यात येते. त्यामुळे विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मैदान उपलब्ध होऊ शकत नाही.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान शनिवारी आणि रविवारी आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये खासगी संस्थांचे कार्यक्रम, खेळाचे सामने यांसाठी भाडेतत्त्वावर दिले जाते. मात्र, त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यापीठाच्या आवारात राहणाऱ्या, विभागांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होत नाहीत. ही मैदाने भाडेतत्त्वावर देण्यात विद्यापीठाला खूप उत्पन्नही मिळत नाही. वर्षांला साधारण दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती ‘सजग नागरिक मंच’ला माहिती अधिकारांत मिळाली आहे.
याबाबत सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले, ‘विद्यापीठाला मैदाने भाडेतत्त्वावर देऊन खूप उत्पन्नही मिळत नाही किंवा मैदाने हे काही विद्यापीठाच्या उत्पन्नाचे साधन नाही. असे असताना विद्यार्थ्यांना मैदाने उपलब्ध करून देण्याऐवजी ती खासगी संस्थांना भाडेतत्त्वावर दिली जातात. याबाबत यापूर्वी विद्यापीठाकडे विविध विद्यार्थी संघटनांनी तक्रारीही केल्या होत्या. मात्र, अद्यापही मैदाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे.’
जी कथा विद्यापीठाच्या मैदानांची आहे, तीच शहरातील इतरही मैदानांची आहे. विविध संस्थांची प्रदर्शने, उत्सव यांसाठी मैदाने भाडेतत्त्वावर दिली जातात. शाळा आणि महाविद्यालयांची मैदानेही सुट्टय़ा असल्यामुळे खासगी कार्यक्रमांसाठी आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामन्यांसाठी दिली जातात. काही मैदाने उन्हाळी शिबिरे चालवणाऱ्या संस्थांना देण्यात आली आहेत. मात्र, त्यामुळे मुलांना मनासारखे खेळण्यासाठी हक्काच्या जागा राहिलेल्या नाहीत.