पुण्याचा गेल्या वर्षीचा गणेशोत्सव वादळी पावसात पूर्णपणे धुवून निघाला. अखेरच्या विसर्जनाच्या दिवशी कोसळलेल्या प्रचंड पावसाने तर सळो की पळो करून सोडले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला. या वर्षीही सुरुवातीचे काही दिवस पावसाची तशीच चिन्हे होती, पण आता हे सावट दूर झाले आहे. उत्सवाच्या उत्तरार्धात आकाशात ढग असतील आणि हलक्या सरीसुद्धा बरसतील. मात्र, वादळी पावसाची शक्यता नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आला आहे.
गणशोत्सवाच्या काळात पुण्यात सामान्यत: पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावतात. मात्र, गेल्या वर्षी गणेशोत्सवात सर्वच दिवस पावसाने विघ्न आणले. विशेषत: दुपारनंतर पडणाऱ्या मोठय़ा वादळी पावसामुळे देखाव्यांवर आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावरही पाणी पडले. शेवटच्या दिवशी तर दुपारी आणि रात्रीसुद्धा पावसाच्या इतक्या मोठय़ा सरी कोसळल्या की, भरपूर गर्दीच्या लक्ष्मी रस्त्यावरही फारशी गर्दी पाहायला मिळाली नाही. या पाश्र्वभूमीवर या वेळी काय होणार, याबाबत उत्सुकता होती. या वर्षी स्थापनेच्या दिवशीच वादळी पावसाच्या मोठय़ा सरी पडल्या. त्याचा सायंकाळच्या मिरवणुकीवर परिणाम झाला. त्यानंतरही दोन-तीन दिवस सकाळपासून उकाडा आणि दुपारनंतर मोठय़ा सरी अशा पावसाने हजेरी लावली. अगदी रविवार-सोमवापर्यंत असेच वातावरण होते. त्यामुळे या वर्षी गर्दीच्या दिवसांत पाऊस गेल्या वर्षी प्रमाणेच रंग दाखवणार, अशी शंका होती. मात्र, आता वेधशाळेच्या अंदाजामुळे ती दूर झाली आहे.
पुणे वेधशाळेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात सध्या फार मोठय़ा पावसाची शक्यता नाही. बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून ढगाळ आकाश आणि पावसाच्या हलक्या सरी असे वातावरण कायम राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे मुसळधार सरींची शक्यता नाही. पुढील आठवडाभर असेच वातावरण राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्याप्रमाणे राज्याच्या इतर भागातही मोजके अपवाद वगळता फार मोठय़ा पावसाची शक्यता नाही. त्यामुळे उत्सवाच्या उत्तरार्धात आणि विसर्जन मिरवणुकीतही गेल्या वर्षीची पुनरावृत्ती अपेक्षित नसल्याचे सांगण्यात आले.

या वर्षी गणपतीत पुण्यात नोंद झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)-
(सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील पाऊस)
२९ ऑगस्ट        ०५.४
३० ऑगस्ट        २२.८
३१ ऑगस्ट        ००
१ सप्टेंबर        १५.०
२ सप्टेंबर        ०१.२
३ सप्टेंबर        ०२.८