पुण्यात हेल्मेट सक्तीला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. रस्त्यावर कारवाई कारण्याऐवजी चलन पाठवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नागपूर आणि मुंबईमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई होते. त्याचप्रमाणे पुण्यातही तंत्रज्ञानाचा वापर करून सीसीटीव्हीच्या साहाय्याने कारवाई करावी.

नियम मोडणाऱ्यांवर रस्त्यावर कारवाई कारण्याऐवजी दंडाचे चलन आकारुन कार्यालय किंवा घरच्या पत्यावर पाठवावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईप्रमाणे पुण्यातही दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. १ जानेवारीपासून पुण्यात पोलिसांकडून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली. या विरोधात शहरातील विविध संघटना एकत्र येत पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

तसेच अनेक भागांमध्ये तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. या सर्व घडामोडी घडत असताना, शहरातील सर्व आमदारांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हेल्मेट सक्तीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली होती. यावेळी सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

याविषयी आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पुणे शहरात पोलिसांकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली. या सक्तीचा फटका दुचाकी चालकांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. या कारवाईबाबत आणि दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याने आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहरातील सर्व परिस्थिती मांडली.