दुचाकी चालविताना हेल्मेट न घालणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यावर आजपासूनच कारवाईला सुरुवात केली. मात्र रस्त्यावरील गर्दीत सरकारी अधिकारी, कर्मचारी ओळखायचे कसा आणि त्यामुळे होणारे वाद याचा विचार करून या हेल्मेटसक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली.  सरकारी कार्यालयातील विभाग प्रमुखांशी संपर्क साधण्यात येणार असून प्रत्येक कार्यालयात याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर ही कारवाई सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी सरकारी कर्मचारी अधिकारी यांना हेल्मेटसक्ती लागू केली. आजपासूनच हा नियम लागू करण्यात आला होता. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी दुचाकी चालविताना हेल्मेट न घालता आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मात्र या घोषणेनंतर आज पोलिसांची पुन्हा बैठक झाली. या बैठकीत  वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, पहिल्या टप्यात सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र अधिकारी आणि कर्मचारी ओळखायचे कसे आणि गाडी अडवून प्रत्येकाकडे ओळखपत्र बघावे लागणार आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या बाबींचा विचार करिता हेल्मेटसक्तीला स्थगिती देण्यात आली असून जनजागृती झाल्यानंतर एक जानेवारी किंवा त्यापूर्वी काही दिवस अगोदर देखील कारवाईला सुरुवात होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.