ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात उपक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीबरोबरच विनाकारण वाजविल्या जाणाऱ्या वाहनांच्या हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणाचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत कारवाईबरोबरच नागरिकांचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक पोलिसांच्या पुढाकाराने मोहीम हाती घेण्यात आली असून, त्याचाच भाग म्हणून शहरात १२ सप्टेंबरला पहिला ‘नो हॉर्न डे’चे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी हॉर्न न वाजविण्याचे आवाहन करण्यात आले असून, या उपक्रमामध्ये अनेक संस्था, संघटना सहभागी झाल्या आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहनांची संख्या सध्या झपाटय़ाने वाढत आहे. विनाकारण वाजविले जाणारे हॉर्न, त्याचप्रमाणे नियमबा कर्णकर्कश हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणातही वाढ झाली आहे. नियमबाह्य हॉर्नबाबत आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. हॉर्नच्या विक्रेत्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एकूण वाजणाऱ्या हॉर्नपैकी ८० टक्के हॉर्न विनाकारण वाजविले जात असल्याचे आरटीओच्या पाहणीतून लक्षात आले आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांचे प्रबोधन होणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने सध्या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे.

शहरात १२ सप्टेंबरला होणाऱ्या ‘नो हॉर्न डे’ उपक्रमाचा कृती आराखडा ठरविण्यासाठी सोमवारी आरटीओमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला विविध शासकीय विभागांचे अधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, वाहतूकदार संघटनेचे प्रतिनिधी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे चालक उपस्थित होते.

शहरामध्ये १२ सप्टेंबरला वाहतूक विभाग, आरटीओचे अधिकारी, शालेय संस्थांकडून महाविद्यालये आणि विविध चौकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. नवचैतन्य हास्य परिवाराच्या वतीने शहरातील ६० पेट्रोल पंपांवर पत्रकांचे वाटप करण्यात येईल. नागरिकांच्या हातामध्ये ‘नो हॉर्न’चा संदेश असलेले बंधन बांधण्यात येणार आहे. हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या माध्यमातून तीन लाख कर्मचाऱ्यांशी संपर्क करून त्यांना या उपक्रमात सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. ईऑन आयटी पार्क आणि माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनाही सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती बाबासाहेब आजरी यांनी दिली.

उपक्रम राज्यभर पोहचविणार

‘नो हॉर्न डे’च्या उपक्रमाला महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशननेही पाठिंबा दिला आहे. जनजागृतीचा हा उपक्रम केवळ पुणे शहर किंवा जिल्ह्यपर्यंत मर्यादित न ठेवता असोसिएशनच्या माध्यमातून तो राज्यभरातील आरटीओच्या कार्यक्षेत्रामध्ये नेण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी दिली. राज्यातील सर्व स्कूल चालक आणि विद्यार्थी या उपक्रमाचा भाग असतील, असेही घाटोळे यांनी स्पष्ट केले.

पालकांनो हॉर्न वाजवू नका!

भविष्यामध्ये रस्त्यावर वाहन चालविणारा सर्वात मोठा घटक हा सध्याचा शालेय विद्यार्थी असणार आहे. त्यामुळे शालेय वयातच त्याच्यात ध्वनिप्रदूषण रोखण्याबाबत जागृती निर्माण व्हावी, तसेच तो आपल्या पालकांकडेही हॉर्न न वाजविण्याचा आग्रह करू शकतो. या गोष्टी लक्षात घेऊन शिक्षण विभागाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना ध्वनिप्रदूषण रोखण्याच्या संकल्पाची शपथ दिली जाणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No horn please in pune
First published on: 11-09-2018 at 01:00 IST