पुण्यात पहिल्यांदा २००९ मध्ये स्वाईन फ्लूचा उद्रेक झाल्यापासून आता २०१५ मध्ये दुसरा उद्रेक होईपर्यंत स्वाईन फ्लूसंबंधी पालिकेच्या आरोग्य विभागाची भूमिका ‘गोळ्या वाटपा’च्या पुढे जाऊ शकलेली नाही. नायडू रुग्णालय आणि कमला नेहरू  रुग्णालय या पालिकेच्या दोनच रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांना दाखल करून घेण्याची सोय असून या दोन्ही रुग्णालयात २००९ पासून व्हेंटिलेटरची सुविधा सुरू करणे पालिकेस शक्य झालेले नाही.
स्वाईन फ्लूच्या २००९ मध्ये आलेल्या साथीत देखील नायडू रुग्णालयात अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नव्हती आणि आताही ती उपलब्ध नाही. कमला नेहरूमध्ये नावाला अतिदक्षता विभाग आहे, पण तिथे तज्ज्ञ डॉक्टरच मिळत नसल्यामुळे तो सुरू नाही. स्वाईन फ्लूमध्ये रुग्णांची अवस्था बिघडल्यास अचानक लागू शकणारी व्हेंटिलेटरची यंत्रणा पालिकेच्या कुठल्याच रुग्णालयात नसल्यामुळे रुग्णांना ससूनमध्ये अथवा खासगी रुग्णालयांमध्ये जाण्याशिवाय दुसरा इलाज उरलेला नाही.
खाटा उपलब्ध असूनही नायडूकडे रुग्णांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. मंगळवारी (१७ मार्च) नायडूमध्ये केवळ ५ रुग्ण दाखल आहेत. यापैकी २ रुग्ण स्वाईन फ्लूचे निदान झालेले तर ३ जण संशयित रुग्ण आहेत. नायडू रुग्णालयाचे अधीक्षक फ्रान्सिस बेनेडिक्ट म्हणाले,‘‘पूर्वी नायडू रुग्णालयाची इमारत जुनी होती, २००९ मध्ये नवीन इमारत बांधून मिळाली. सुरुवातीपासून नायडू रुग्णालयात २०० खाटा उपलब्ध आहेत. सध्या त्यापैकी ६० खाटा स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी वेगळ्या काढल्या आहेत. मागणी वाढल्यास रुग्णालयातील इतर वॉर्डही स्वाईन फ्लूच्या रुग्णांना दाखल करण्यासाठी उपलब्ध करता येतील.’’
‘गोळ्या वाटप’ हाच प्रमुख कार्यक्रम!
रुग्णांना ऑसेलटॅमीविरच्या (टॅमी फ्लू) गोळ्या वाटणे एवढाच पालिकेचा प्रमुख कार्यक्रम झाला आहे. त्यादेखील शहरातील सर्व रुग्णालयातील रुग्णांना मोफत पुरवल्या जात नाहीत. खासगी रुग्णालयातून नायडूमध्ये येणाऱ्या रुग्णांना टॅमी फ्लू गोळ्या पुरवल्या जात नाहीत. पालिकेची रुग्णालये व दवाखाने अशा ५५ ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात ‘उपचार केंद्रे’ सुरू करुन स्वाईन फ्लूसदृश लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना तपासून त्यांना ऑसेलटॅमीविर गोळ्या देण्याची सोय करण्यात आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपप्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ‘‘उपचार केंद्रे बाह्य़रुग्ण विभागासारखे काम करत असून या ठिकाणी रुग्णांना दाखल करण्याची सोय नाही. ती सोय केवळ नायडू व कमला नेहरू रुग्णालयात आहे.’’ अन्न व औषध प्रशासनाने पुण्यात २१२ औषधविक्री दुकानांमध्ये या गोळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत, खासगी रुग्णालयात जाणारे रुग्ण तिथून गोळ्या खरेदी करतील असे पालिकेचे म्हणणे आहे.
असे रखडतात अतिदक्षता विभाग!
‘जागा उपलब्ध नाही’ हे असुविधेसाठी वारंवार दिले जाणारे कारण नायडूमध्ये अतिदक्षता विभाग नसण्यासाठीही पुढे करण्यात आले आहे. आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी म्हणाले, ‘‘२००९-१० मध्ये कमला नेहरू रुग्णालयात जो अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार होता तोच नायडू रुग्णालयासाठी होता. कारण नायडू रुग्णालयात आयसीयूसाठी जागा नाही. त्यानंतर स्वाईन फ्लू संपला आणि कमला नेहरूचे आयसीयू अजूनदेखील सुरू झाले नाही. हाच आयसीयू सुरू न झाल्यामुळे नायडूच्या आयसीयूसाठी प्रस्ताव देता आला नाही. कमला नेहरूचे आयसीयू २०११ ला तयार झाले, त्याच्यासाठी गरजेचा असलेला ‘सेन्ट्रल ऑक्सिजन’चा प्रकल्प डिसेंबर २०१४ मध्ये पूर्ण झाला. आता आयसीयू चालवण्यासाठी आम्हाला तज्ज्ञ मिळत नाहीत. तज्ज्ञ डॉक्टरांसह एकूण १२४ पदे मंजूर झाली आहेत, तोपर्यंत बंधपत्रित डॉक्टरांकरवी आयसीयू चालवण्याचा प्रस्ताव आहे.’’