ब्रिटिशांच्या राजवटीचा रंगभूमी, स्थापत्यकला, चित्र आणि नृत्य या दृश्यकलांवर परिणाम झाला. इंग्रजी अंमल असल्याने रोमन, ग्रीक आणि इजिप्तीयन संगीत लुप्त झाले. मात्र, वेदांपासून उत्पत्ती झालेले भारतीय संगीत ब्रिटिशांना समजलेच नाही. ब्रिटिशांच्या हस्तक्षेपाअभावी भारतीय संगीत अबाधित राहिले, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश कर्नाड यांनी रविवारी व्यक्त केले.
साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे ‘मॉडर्न इंडियन कल्चर’ या विषयावर गिरीश कर्नाड यांचे व्याख्यान झाले. प्रसिद्ध नाटककार मकरंद साठे अध्यक्षस्थानी होते.
गिरीश कर्नाड म्हणाले, भारतामध्ये पूर्वी रंगभूमी असली तरी रंगमंच आणि रंजनासाठी पैसे देण्याची कल्पना ब्रिटिशांनी विकसित केली. मुंबईमध्ये होत असलेल्या नाटकामध्ये धनाढय़ पारशी लोकांची गुंतवणूक होती. मुस्लीम लेखकांनी लिहिलेली नाटके आणि पाहणारे प्रेक्षक हिंदूू अशी रंगभूमी क्षेत्रात अनोखी धर्मनिरपेक्षता होती. ८ व्या शतकापासून ते १८ व्या शतकापर्यंत भारतामध्ये यक्षगान, कथकली या माध्यमातून रंगभूमी अस्तित्वात होती. पण, नवी नाटके आणि नाटककार दिसत नाहीत. १९ व्या शतकात इंग्रजांनी शेक्सपिअर हा महत्त्वाचा नाटककार पुढे केला. तोपर्यंत केवळ नाटककार आणि कवी असलेला कालिदास हा भारतीय आणि हिंदूू संस्कृतीचे प्रतीक झाला. कालिदासाची नाटके मराठी आणि कन्नडमध्ये अनुवादित झाली.
वसाहतवादाने इंग्रजी भाषा रुढ केली याकडे लक्ष वेधून गिरीश कर्नाड म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानाचा लाभ उठवून भारतीयांनी छायाचित्रण, ध्वनिमुद्रण या कला आत्मसात केल्या. मूकपट आणि नंतरच्या कालखंडातील बोलपट या चित्रपटाच्या विकासामध्ये संगीताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गेल्या दोन दशकांमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा मोठय़ा प्रमाणावर विकास झाला आहे. एकटय़ा कन्नडमध्ये २० वाहिन्या आहेत. वाहिनीमुळे कलाकारांना काम मिळते. मराठीचा वापर होत आहे. शहर आणि गाव यातील अंतर दूर केले असून नव्या पद्धतीचे नागरीकरण अस्तित्वात आले आहे.’’
मकरंद साठे यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.