एका दुर्घटनेत तीन महिलांचा जीव जातो. काहीही चूक नसताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढावतो.. चर्चा होते, पण तेवढय़ापुरतीच! पुढे वर्ष उलटले तरी विशेष काही झाले नाही. दुर्घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर नावापुरता गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्याशिवाय प्रशासन ठप्पच.. आता तरी कारवाई व्हावी यासाठी मृतांच्या नातेवाइकांनाच रस्त्यावर उतरावे लागते आहे!
दांडेकर पुलाजवळ पुनर्विकासाचे काम सुरू असताना गेल्या वर्षी एक भिंत कोसळली. त्याच्या खाली सापडल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेला १७ जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, अद्यापही संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. याच्या निषेधार्थ त्या वेळी मृत्यूमुखी पडलेल्या मीरा आठल्ये यांचे पती शिरीष आठल्ये हे स्वत:च मोर्चा काढणार आहेत. आपण १६ जून रोजी असा मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती त्यांनी प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे. या दुर्घटनेत दोषी असलेल्यांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांचे नाव काळ्या यादीत टाकून त्याच्या इतर बांधकामांना परवानगी नाकारावी, मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी, अशा मागण्या आठल्ये यांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी १६ जून रोजी दुपारी ४ वाजता शनिवार वाडा ते महापालिका भवन असा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
ए. व्ही. मुळे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने दांडेकर पुलाच्या जवळ असलेल्या सुवर्णानंद पार्कच्या मागील बाजूला असलेल्या सीमाभिंतीची पुनर्बाधणी करण्यात आली. जुन्या भिंतीवर नवीन भिंत बांधून तिची उंची वाढवण्यात आल्यामुळे ही भिंत धोकादायक बनली होती. १७ जून रोजी ही भिंत अचानक कोसळली व तेथून पायी जाणाऱ्या मीरा आठल्ये, शारदा माझिरे आणि माधवी पांगारकर या तीन महिलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कंपनीच्या बांधकाम व्यावसायिक, कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनिअर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असून अजूनही संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नाही, असे आठल्ये यांनी प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.