भारतात अद्यापपर्यंत तरी कडव्या विचारांच्या प्रसाराचे प्रमाण तितके मोठे नाही. देशात कडव्या विचारांचे काही लोक आहेत. मात्र, त्यांची संख्या फारच कमी असल्याचे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांनी सांगितले. ते मंगळवारी पुणे येथील युथ फॉर डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी भारतातील इस्लाम धर्माचे स्वरूप नेहमीच सहिष्णू राहिल्याचे सांगितले. अगदी मुघलांच्या काळातही गोहत्येला बंदी होती. याशिवाय, आत्तादेखील सर्व मुस्लिम धर्मगुरू आणि उलेमा दहशतवादाचा निषेध करतात. त्यामुळे सध्या कडव्या विचारांचा सामना कशाप्रकारे करता येईल, याचा नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दोवल यांना भारत दहशतवादाला कशाप्रकारे प्रत्युत्तर देत आहे, यासंबंधीही प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना दोवल म्हणाले की, दहशतवाद्यांचे मनसुबे आणि क्षमता फोल ठरवणे हाच त्यांना प्रत्युत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आणि रणनीतीचा वापर करून दहशतवाद्यांचे डाव उधळले जात आहेत. याठिकाणी तुम्हाला बॉक्सिंगच्या खेळाप्रमाणे मार न खाण्याची काळजी घेत प्रतिस्पर्ध्याला योग्यवेळी जोरदार फटका मारायचा असतो. मात्र, युद्धासाठी काहीप्रमाणात रक्त सांडावेच लागते आणि बलिदानही द्यावे लागते.
दरम्यान, यावेळी दोवल यांनी ‘जेएनयू’ विद्यापीठात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांसंदर्भातही भाष्य केले. देशात फुटीरतावादाची चर्चा होणे, ही काही समस्या नाही. मात्र, या सगळ्यावर समाज कशाप्रकारे व्यक्त होतो, हे फार महत्त्वाचे असते. जर समाजाने अशा घोषणांविरोधात रोष व्यक्त केला नाही तर ती खूप मोठी समस्या ठरू शकते, असे अजित दोवल यांनी सांगितले.