राष्ट्रवादी काँग्रसमधील आमदारांसह नेते मंडळींची सध्या सुरू असलेल्या गळतीबाबत बोलताना, राष्ट्रवादीचे नेते व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी, पक्षातून कितीहीजण गेले तरी आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी पवार साहेबांसोबतच आहोत. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष पुन्हा उभा करू असे म्हटले आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमासाठी ते आले असता, त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, मागील काही दिवसांपासून भाजप आणि सेनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, नेते जात आहेत. तिथे गेल्यावर ते पवार साहेबांबद्दल आदर व्यक्त करतात. मात्र पक्षातून कितीहीजण गेले तरी आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी साहेबांसोबत आहोत. तसेच, यापुढील काळात निवडणुकीला सामोरे जाताना सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन, पुन्हा राष्ट्रवादी पक्ष ताकदीने उभा करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी यावेळी भूमिका मांडली. तसेच पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधून भाजप, सेनेत प्रवेश करणार्‍यांना अनेक शब्द देऊन घेतले जात आहे. पण सध्याचे विद्यमान आणि त्यांच्याकडील इच्छुक असणार्‍या उमेदवारांची संख्या सत्ताधारी पक्षाकडे आधिक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर भाजपा आणि सेनेमधील अगोदरच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अगोदर संधी दिली जाणार की, बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी देणार? यातून मार्ग काढताना त्यांना एक प्रकारे कसरत करावी लागणार आहे. यामुळे सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते सैरभैर झाल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा राज्यात चित्र निश्चित वेगळे दिसेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री सतत महायुती होणार असे प्रत्येक भाषणात सांगत आहेत. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता काही सांगता येत नसल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.