News Flash

पैसे नको;  ताट, वाटी द्या

रहिवाशांना मानसिक धक्का बसला आहे. सरकारी यंत्रणेकडून तेथे पंचनामा करण्यात येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वाहून गेलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी युवकांकडून मदतीचे आवाहन

कालवा फुटल्यानंतर दांडेकर पूल भागातील अनेकांने संसार वाहून गेले. श्रमिकांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील अनेक रहिवाशांनी पै पै करून संसार उभा केला होता. या घटनेत अनेकांच्या घरांना तडे गेले. पत्र्याच्या झोपडय़ा वाहून गेल्या. संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले. या भागातील रहिवाशांना मदत देण्यासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. सिंहगड रस्ता भागातील तीन युवकांनीही मदतीसाठी पुढाकार घेऊन ताट, वाटी, चमचा देण्याचे आवाहन दात्यांना केले आहे. या भागात अनेकांकडे सध्या अन्न वाढून घ्यायला ताट, वाटी, चमचादेखील नाही. त्यामुळे पैसे नको; ताट, वाटी, चमचा द्या असे आवाहन करत या युवकांकडून मदत गोळा केली जात आहे.

दांडेकर पूल भागातील रहिवासी अद्याप कालवा फुटीच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. अनेकांची महत्त्वाची कागदपत्रे, ऐवज वाहून गेला आहे. साठवलेल्या पैशातून खरेदी करण्यात आलेल्या गृहोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. काही इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्यामुळे पूर्णपणे निकामी झाल्या आहेत. सरकार, महापालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था तसेच काही सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मदत उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

रहिवाशांना मानसिक धक्का बसला आहे. सरकारी यंत्रणेकडून तेथे पंचनामा करण्यात येत आहे. केवळ अंगावरच्या कपडय़ानिशी अनेक जण विस्कटलेला संसार सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या भागात काम करणारे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते अविनाश खंडारे, अविनाश रायरीकर, दीपक गायकवाड यांनी या भागातील रहिवाशांना मदतीचा हात देण्यासाठी ‘पैसे नको; ताट, वाटी, चमचा द्या’, हा उपक्रम राबविला आहे.

या बाबत खंडारे, रायरीकर, गायकवाड म्हणाले, दांडेकर पूल भागातील रहिवाशांना अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. अनेक कुटुंबे कालवा फुटीच्या घटनेनंतर अक्षरश: रस्त्यावर आली  आहेत. काही जणांक डे अंथरूण, पांघरूण देखील नाही. या भागातील रहिवाशांचा संसार उभा करण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.

जीवनावश्यक वस्तू पाण्याच्या लोंढय़ात वाहून गेल्या आहेत. चिखलामुळे कपडे पूर्णपणे खराब झाले आहेत. आम्ही मित्रांनी चर्चा केली. या भागात रहिवाशांना शासकीय पातळीवर, संस्था, संघटनांकडून मदत मिळेलच, पण वैयक्तिक पातळीवर आपण काय करू शकतो, याचा विचार आम्ही केला. शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेलच, पण आपणही सामाजिक जबाबदारीतून काहीतरी करावे, या विचारातून नागरिकांना ताट, वाटी, चमचा तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. अनेकांकडे ताट, वाटी, चमचे या जीवनावश्यक वस्तू गरजेपेक्षा जास्त असतात. दैनंदिन वापरातील या वस्तू त्यांनी दिल्या तर या भागातील रहिवाशांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी खारीचा वाटा उचलला जाईल.

गरजेपेक्षा जास्त असलेल्या वस्तू आम्हाला द्याव्यात. आम्ही नागरिकांकडून पैसे न स्वीकारता अशीच मदत स्वीकारत आहोत. या सत्कार्यात नागरिकांनी सहभागी व्हावे. ही वस्तुरूपी मदत पर्वती पायथा भागातील साने गुरुजी स्मारक येथील राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयात स्वीकारली जाणार आहे. मदतीसाठी पुढील क्रमांकावर इच्छुक संपर्क साधू शकतात. अविनाश खंडारे (९२७३९५०३७३), अविनाश रायरीकर (९८२३९१६०७०), दीपक गायकवाड (८४४६७७९०९०).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 1:45 am

Web Title: no money give dish cup
Next Stories
1 पिंपरीतील पाणीपुरवठा आठ दिवसांत सुरळीत करण्याचे आश्वासन
2 या वर्षी पाऊस कमीच
3 ‘पेन’च्या कविसंमेलनात माणूसपणाचा जागर
Just Now!
X