जिल्हाधिकाऱ्यांचे ओळखपत्र पुरेसे; पोलिसांना आदेश

पुणे : जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाडय़ा तसेच बाजार आवारातील व्यापारी, कामगार यांना जिल्हाधिकाऱ्यांनी ओळखपत्र दिले असून त्यांची अडवणूक होता कामा नये, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आदेश दिले.

शहरातील भुसार व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या आठमुठेपणामुळे सोमवारपासून (१३  एप्रिल) बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या दी पूना र्मचट्स चेंबरचे प्रतिनिधी, आडते, हमाल, तोलणार संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. या बैठकीत डॉ. म्हैसेकर म्हणाले, भुसार माल, भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची अडवणूक करू नये. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहनचालक, बाजार आवारातील कामगार, व्यापारी, आडते यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून ओळखपत्र देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले ओळखपत्र पुरेसे आहे. हे ओळखपत्र  पाहून त्यांना सोडावे. त्यांची अडवणूक करू नये.

अत्यावश्यक सेवेतील वाहनचालकांना पोलिसांनी परवाने दिले आहेत. बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना परवाने देण्यात आले असून परवान्याचा गैरवापर करू नये, असे त्यांनी सांगितले.